पालघर - जिल्ह्यात घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू - जिल्हाधिकारी जाखड
पालघर, 13 मार्च (हिं.स.)। जागतिक पातळीवर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर घरगुती एलपीजी गॅसच्या तुटवड्याबाबत काही ठिकाणी अफवा पसरत असल्याचे निदर्शनास आले असले, तरी पालघर जिल्ह्यात घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू असून कोणत्याही
जिल्ह्यात घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू - जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड


पालघर, 13 मार्च (हिं.स.)। जागतिक पातळीवर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर घरगुती एलपीजी गॅसच्या तुटवड्याबाबत काही ठिकाणी अफवा पसरत असल्याचे निदर्शनास आले असले, तरी पालघर जिल्ह्यात घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू असून कोणत्याही प्रकारचा तुटवडा निर्माण झालेला नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

जिल्ह्यातील नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच अनावश्यक घाईगडबड करून गॅस सिलेंडर साठवण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. घरगुती एलपीजी गॅस हा केवळ घरगुती वापरासाठीच असल्याने त्याचा व्यावसायिक अथवा अन्य अनधिकृत वापर केल्यास संबंधित व्यक्ती किंवा आस्थापनांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालय, भारत सरकार यांच्या निर्देशानुसार तसेच भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या तेल विपणन कंपन्यांच्या नियमांनुसार साठेबाजी व काळाबाजार रोखण्यासाठी दोन सिलेंडर बुकिंगमध्ये किमान २५ दिवसांचा कालावधी ठेवणे बंधनकारक आहे. त्यामुळे एका सिलेंडरचे वितरण झाल्यानंतर २५ दिवस पूर्ण झाल्यावरच पुढील सिलेंडरचे बुकिंग करता येते.

दरम्यान, जिल्ह्यातील सर्व गॅस वितरकांना ग्राहकांनी बुकिंग केल्यानंतर नियमानुसार शक्य तितक्या लवकर सिलेंडरची डिलिव्हरी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बुकिंगसंदर्भात किंवा कोणत्याही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास नागरिकांनी संबंधित गॅस एजन्सीशी संपर्क साधावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

तक्रार निवारणासाठी जिल्हा प्रशासनाने ०२५२५-२९७४७४ आणि ८९८३४५६३४७ (व्हॉट्सअप) हे दोन संपर्क क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत. या क्रमांकांवर फोन किंवा संदेशाद्वारे नागरिकांना त्यांच्या समस्या नोंदविता येणार आहेत. तसेच आश्रमशाळा, रुग्णालये आणि मध्यान्ह भोजन यांसारख्या अत्यावश्यक सेवांसाठी व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा नियमितपणे सुरू ठेवण्यात येणार असून या ठिकाणी काही अडचण निर्माण झाल्यास संबंधित वितरकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL


 rajesh pande