
चंद्रपूर, 13 मार्च (हिं.स.)।
शुक्रवार १३ मार्च सकाळी ११ ते दुपारी ३ या नामनिर्देशन पत्र स्वीकृतीच्या कालावधीत एकूण ३ अर्ज दाखल करण्यात आले आहे. यामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून मनस्वी संदीप गिऱ्हे यांचे २ अर्ज तर काँग्रेस पक्षातर्फे वसंत राजेश्वर देशमुख यांचा १ अर्ज प्राप्त झाला आहे.
चंद्रपूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी इच्छुक सदस्यांसाठी कोरे नामनिर्देशन पत्रे ११ ते १२ मार्च या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत महानगरपालिका सचिव यांच्या कक्षात उपलब्ध करून देण्यात आली होती. या कालावधीत एकूण ७ अर्जांची उचल करण्यात आली.
दरम्यान, स्थायी समिती सभापती पदासाठी सोमवार १६ मार्च रोजी विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. सभेची सुरुवात झाल्यानंतर नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात येईल. वैध नामनिर्देशन पत्रे दाखल केलेल्या उमेदवारांना नामनिर्देशन पत्र मागे घेण्यासाठी १५ मिनिटांचा कालावधी देण्यात येणार आहे. जर एकापेक्षा अधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले, तर मतदान प्रक्रिया पार पाडण्यात येऊन त्यानंतर निकाल जाहीर करण्यात येईल.
या बैठकीस महानगरपालिकेचे सर्व स्थायी समिती सदस्य उपस्थित राहणार असून निवडणूक प्रक्रिया नियमानुसार व पारदर्शक पद्धतीने पार पाडली जाणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव