
नाशिक, 13 मार्च, (हिं.स.)।- प्रभाग १६ मधील टाकळी जुना सायखेडा रोड ते जेलरोडदरम्यानचा १८ मीटर डीपी रस्ता तसेच नंदिनी-गोदावरी संगम पूल या महत्त्वाच्या कामांकडे प्रशासनाने दीर्घकाळ दुर्लक्ष केल्याचा आरोप करत सत्ताधारी स्थानिक नगरसेवकांसह नागरिकांना मनपासमोर उपोषण आंदोलन करावे लागले. सिंहस्थ प्रकल्पात या कामांचा तत्काळ समावेश करून मंजुरी द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
प्रभागातील टाकळी जुना सायखेडा रोड ते जेलरोड जोडणारा १८ मीटर डीपी रस्ता आणि नंदिनी गोदावरी संगम पूल ही कामे अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. गेल्या दीड वर्षापासून महापालिका प्रशासन, कुंभमेळा आयुक्त तसेच विभागीय आयुक्तांकडे वारंवार लेखी पाठपुरावा करूनही कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचा आरोप मनपा आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आला आहे.
दरम्यान, केंद्र व राज्य शासनाने आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी मोठा निधी मंजूर केलेला असतानाही ज्या भागात प्रत्यक्ष सिंहस्थ मेळा होणार आहे त्या भागातील मूलभूत कामांचा प्रकल्पात समावेश न केल्याबद्दलही नाराजी व्यक्त करण्यात आली. उलट कुंभमेळ्याशी थेट संबंध नसलेल्या भागातील रस्ते वकामांना प्राधान्य दिले जात असल्याने शासनाच्या निधीचा गैरवापर होत असल्याचा आरोपही आंदोलनकर्त्यांनी केला. सत्ताधारी नगरसेवक राहुल दिवे, प्रशांत दिवे यांच्यासह ए. जोंधळे, ज्योती जोंधळे, पूजा नवले आदींनी या लाक्षणिक आंदोलनात भाग घेतला होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV