
चंद्रपूर, 16 मार्च (हिं.स.)। चंद्रपूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदी शिवसेना (उबाठा) च्या मनस्वी संदीप गिऱ्हे यांची ईश्वर चिट्ठीद्वारे निवड करण्यात आली. सोमवारी मनपा राणी हिराई सभागृहात झालेल्या विशेष बैठकीत पार पडलेल्या निवडणूक प्रक्रियेनंतर जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी निकाल जाहीर केला.
चंद्रपूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी १३ मार्च रोजी एकूण ३ अर्ज दाखल करण्यात आले होते. यामध्ये शिवसेना (उबाठा) गटाकडून मनस्वी संदीप गिऱ्हे यांचे २ अर्ज तर काँग्रेस पक्षातर्फे वसंत राजेश्वर देशमुख यांचा १ अर्ज प्राप्त झाला होता.सोमवारी दुपारी विशेष बैठकीची कारवाई सुरू करण्यात आली. सभेची सुरुवात झाल्यानंतर नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात आली. वैध उमेदवारांना नामनिर्देशन पत्र मागे घेण्यासाठी १५ मिनिटांचा कालावधी देण्यात आला. या कालावधीत कुणीही अर्ज मागे न घेतल्याने हात उंचावून मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यात आली.
मतदानामध्ये मनस्वी संदीप गिऱ्हे यांना ८ तर वसंत राजेश्वर देशमुख यांना ८ अशी समसमान मते प्राप्त झाली. त्यामुळे नियमानुसार ईश्वर चिट्ठीद्वारे निवड प्रक्रिया पार पाडण्यात आली. या प्रक्रियेत मनस्वी गिऱ्हे यांच्या नावाची चिट्ठी निघाल्याने जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी त्यांना चंद्रपूर महानगरपालिका स्थायी समितीचे सभापती म्हणून घोषित केले.चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौरपदी भारतीय जनता पक्षाच्या संगीता राजेंद्र खांडेकर यांची, तर प्रशांत आनंदराव दानव यांची उपमहापौरपदी १० फेब्रुवारीला निवड झाली. आता चंद्रपूर मनपात भाजप व शिवसेना (उबाठा) ची पूर्णपणे सत्ता हातात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव