
रत्नागिरी, 16 मार्च, (हिं. स.) : सुवर्णसूर्य फाउंडेशन आयोजित गणपतीपुळे अल्ट्रा मॅरेथॉन – दुसरे पर्व अतिशय उत्साही वातावरणात पार पडले. विविध गटांत शरद खिलारे, रजनी सिंग, आदित्य धुळप, श्रुती भिडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन मध्यरात्री १२ वाजता श्री क्षेत्र गणपतीपुळे देवस्थानाच्या आवारात जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आले. सुवर्णसूर्य फाउंडेशनचे संचालक प्रसाद देवस्थळी यांनी स्पर्धेसंबंधी थोडक्यात माहिती दिली. उद्घाटनप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, जिल्हा परिषद सदस्य राजू साळवी, पंचायत समिती सदस्य सौ. दुर्गवळी, गणपतीपुळे देवस्थानचे सरपंच श्री. कोल्हटकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
स्पर्धेत ५६ किलोमीटरच्या स्पर्धेत पुरुषांच्या गटात बीड येथील शरद खिलारे यांनी, तर महिलांच्या गटात रजनी सिंग यांनी अव्वल स्थान मिळवले. ३५ किलोमीटरच्या स्पर्धेत पुरुष गटात रत्नागिरीचे आदित्य धुळप आणि महिला गटात पुणे येथील श्रुती भिडे यांनी प्रथम क्रमांक मिळवला.
स्पर्धेत भारतातील विविध राज्यांतील सुमारे २५० धावपटूंनी या सहभाग घेतला. रात्रीच्या धावासाठी प्रत्येक स्पर्धकाकडे हेड टॉर्च होती. मार्गावर दहा ठिकाणी हायड्रेशन पॉइंट ठेवण्यात आले होते. येथे पाणी, विविध फळे, एनर्जी ड्रिंक, सरबत, खजूर तसेच पाण्याच्या फवार्याची व्यवस्था करण्यात आली होती. सुवर्णसूर्य फाउंडेशनला विविध संस्थांच्या स्वयंसेवकांनी सहकार्य केले. तसेच रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या सदस्यांनी सायकलवरून धावपटूंना साथ दिली. स्पर्धकांनी मार्गावरील हायड्रेशन पॉइंट, आदरातिथ्य आणि उत्कृष्ट नियोजनामुळे ही स्पर्धा अत्यंत संस्मरणीय झाल्याचे सांगितले.
कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन, गणपतीपुळे अल्ट्रा मॅरेथॉन आणि रत्नागिरी सायक्लिस्ट क्लब आयोजित रोलर कॉस्टर सायक्लोथॉन या उपक्रमांमुळे रत्नागिरी जिल्हा तसेच जिल्ह्यातील जवळपास पंचवीस गावे आता जागतिक पटलावर पोहोचू लागली आहेत. या सर्व उपक्रमांमधील सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे या उपक्रमांसाठी काम करणाऱ्या सुमारे ऐंशी टक्के एजन्सी कोकणातीलच आहेत.
गेल्या तीन ते चार वर्षांपासून स्वतःच्या संकेतस्थळावरून नोंदणी, स्थानिक फोटोग्राफर्सची टीम तसेच आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आधारित फोटोग्राफी यांसारख्या आधुनिक सुविधा या स्पर्धांमध्ये यशस्वीपणे राबवण्यात येत आहेत.
स्पर्धेचा सविस्तर निकाल असा -
५६ किमी - पुरुष गट – शरद खिलारे, राहुल पवार, मनीष यादव
महिला गट – रजनी सिंग, नेहा रंजन, गीता परब
३५ वर्षांखालील – पुरुष : राहुल पवार, मनीष यादव, स्वप्नील सूर्यवंशी
३६ ते ५० – पुरुष : शरद खिलारे, अमितकुमार यादव, अमोल पटेल
महिला – रजनी सिंग, नेहा रंजन, गीता परब
५१ वर्षांवरील – पुरुष : आशुतोष गोडबोले, संतोष गायकवाड, नीलेश सावंत
महिला – पूजा वर्मा
३५ किमी - पुरुष – आदित्य धुळप, संतोष शिंदे, रविंद्र
महिला – श्रुती भिडे, टिनू शर्मा, मानसी मराठे
३५ वर्षांखालील – पुरुष : आदित्य धुळप, संतोष शिंदे, अश्वनी पांडे
महिला – तनुश्री मालवीय, प्रभांशी धनकर
३६ ते ५० वयोगट – पुरुष : रवींद्र, सीताराम नांदोसकर, डॉ. महेश भिसे
महिला – टिनू शर्मा, मानसी मराठे, सुरिंदर जम्मुअल
५१ वर्षांवरील – पुरुष : वेंकटेश प्रभुदेसाई, डॉ. दादासाहेब सारंगकर, हेमंत भागवत
महिला – श्रुती भिडे, शेरिअन डौराडो, शालिनी वाझ
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी