
मुंबई, 16 मार्च (हिं.स.)
: चंदगड तालुक्यातील (जि. कोल्हापूर) इसापूर येथील आरोग्यवर्धिनी उपकेंद्रात लवकरच समुदाय आरोग्य अधिकारी (सीएचओ) नियुक्त करून आरोग्यसेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत दिली.
विधानसभेत सदस्य शिवाजीराव पाटील यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे इसापूर आरोग्यवर्धिनी केंद्रातील डॉक्टरांची उपलब्धता, आरोग्य सेवा व इतर सुविधांबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य राजू नवघरे, बाबासाहेब देशमुख यांनी सहभाग घेतला. त्यावर उत्तर देताना मंत्री आबिटकर बोलत होते.
मंत्री आबिटकर म्हणाले, इसापूर आरोग्यवर्धिनी केंद्र पाच छोट्या खेड्यांसाठी आणि सुमारे 700 लोकसंख्येसाठी कार्यरत आहे. या केंद्रासाठी सीएचओ पदाची मागणी करण्यात आली असून त्यासाठी जाहिरातही काढण्यात आली आहे. निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात प्रतीनियुक्तीवर सीएचओ देऊन केंद्राचे कामकाज तात्काळ सुरू करण्यात येईल. तसेच उपकेंद्राला आवश्यक असलेल्या स्वच्छता व इतर सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.
चंदगडसारख्या डोंगराळ व दुर्गम भागात आरोग्यसेवा मजबूत करण्यासाठी आयुष रुग्णालय सुरू करण्याबाबतचा प्रस्तावस शासनस्तरावर मान्यता मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
याशिवाय चंदगड ग्रामीण रुग्णालयाच्या सुधारणा आणि सुविधांसाठी सुमारे 1 कोटी 90 लाख रुपयांचा निधी मंजूर केल्यची माहिती मंत्री आबिटकर यांनी दिली. ग्रामीण रुग्णालयांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता वाढवण्यासाठी काही ठिकाणी पीपीपी (पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप) पद्धतीने सेवा सुरू करण्याचे धोरण राबविण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. मेळघाट आणि नंदुरबारसारख्या दुर्गम भागात या पद्धतीचा सकारात्मक अनुभव मिळाल्याने चंदगडमध्येही त्याचा विचार करण्यात येणार असल्याचे आबिटकर यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी