
रुग्णाची प्रकृती स्थिर; डॉ. अंबरीश चॅटर्जी आणि त्यांच्या टीमचे सर्व स्तरांतून कौतुक
नाशिक, 16 मार्च (हिं.स.)।
एसएमबीटी हॉस्पिटलच्या 'एसएमबीटी कॅन्सर इन्स्टिट्यूट' मध्ये १६ वर्षांच्या मुलीवर यकृतातील मोठ्या गाठीची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. ही शस्त्रक्रिया कर्करोग शस्त्रक्रियातज्ज्ञ डॉ. अंबरीश चॅटजीं आणि त्यांच्या टीमने केली. या मुलीच्या, यकृतात सुमारे १२-१०-१२ सेमी आकाराची गाठ आढळली. बायोप्सीनंतर 'फोकल नोड्युलर हायपरप्लेशिया' असल्याचे निष्पन्न झाले.
गेल्या अनेक वर्षांपासून कुटुंबीय आणि डॉक्टर्स यांच्या निगराणीखाली ही रुग्ण होती. त्यानंतर, अलीकडेच लक्षणे आढळून आल्यामुळे कुटुंबीयांशी चर्चा करून शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. १२ तास चाललेल्या या शस्त्रक्रियेत 'लेफ्ट हेपॅटेक्टॉमी' करून यकृतातील प्रभावित सेगमेंट २, ३ आणि ४ काढून टाकण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती स्थिर असून तिला रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. या प्रक्रियेत भूलतज्ज्ञ, आयसीयू टीम, रेडिओलॉजी विभाग, तसेच नर्सिंग स्टाफ यांचे महत्त्वाचे योगदान राहिले. एसएमबीटी हॉस्पिटलचा मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पिटलसोबत तांत्रिक मार्गदर्शनाचा करार असून येथे आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. या यशस्वी शस्त्रक्रियेसाठी डॉ. अंबरीश चॅटर्जी आणि टीमचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV