नायगाव बिडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील डॉ. आंबेडकर संकुलातील ८६४ सदनिकांचे वितरण
मुंबई, 16 मार्च (हिं.स.) - मुंबईतील नायगाव बिडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संकुलातील ८६४ सदनिकांचा वितरण समारंभ आज पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते या सदनिकाधारकांना चाव्यांचे प्रातिनिधिक स्वरूपा
चावी वाटप


मुंबई, 16 मार्च (हिं.स.) - मुंबईतील नायगाव बिडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संकुलातील ८६४ सदनिकांचा वितरण समारंभ आज पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते या सदनिकाधारकांना चाव्यांचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले. त्यामुळे हा दिवस त्यांच्या आयुष्यात पाडव्याआधीच गोडवा आणणारा ठरला.

यावेळी बोलताना, बीडीडी चाळीत राहणारे सर्वजण आता टॉवरमध्ये राहणार आहेत, एक वेगळा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर आज चाव्या घेताना पहिला असल्याचे शिंदे यांनी म्हटले. आज अनेकांचे नवीन घरात जाण्याचे स्वप्न पूर्ण होत आहे याचा मला विशेष आनंद आहे. देवेन्द्रजी मुख्यमंत्री असताना या प्रकल्पाला सुरुवात झाली, त्यानंतर मधल्या काळात सरकार बदलले, त्यामुळे काही स्पीडबेकर मध्ये आले. देवेंद्रजीना कालच 'डॉक्टर ऑफ सायन्स' पदवी मिळाली, मी जरी डॉक्टर नसलो तरी २०२२ ला आम्ही दोघांनी मिळून एक ऑपरेशन केले, त्यामुळेच नंतर प्रकल्पाला पुन्हा गती मिळाली असे नमूद केले. ३० जूनला पुन्हा सरकार स्थापन झाल्यावर दोनच महिन्यात या प्रकल्पातील पोलिसांना सवलतीमध्ये घरे देण्यासह अनेक महत्त्वाचे निर्णय आम्ही घेतले. घर हे प्रत्येकाचे स्वप्न असते आणि स्वप्नपूर्तीचा जो आनंद असतो तो सगळ्यात जास्त असतो, आज ते स्वप्न बीडीडीवासियांचा पूर्ण होते आहे याचा मला विशेष आनंद वाटत असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.

घर हा कुटुंबाच्या सुख समाधानाचा, आत्म सन्मानाचा सुख समृद्धीचा पाया आहे. बीडीडी चाळीना अनेक वर्षांचा ऐतिहासिक वारसा आहे. या चाळीनी स्वातंत्र्याचा लढा अनुभवला आहे, गिरण्यांचा सुवर्णकाळाच्या त्या साक्षीदार आहेत, कामगार चळवळ, दलीत पँथर चळवळ अशा अनेक चळवळी पहिल्या आहेत. पिढ्यानपिढ्या या चाळीत राहणाऱ्यांचे सामाजिक आणि संस्कृतिक ऋणानुबंध या वास्तुशी जोडले गेले आहेत. तीन ते चार पिढ्या आपल्या या चाळीत गेल्या. १५० ते १६० फुटांच्या चाळीत आयुष्य काढणे किती अवघड असते हे आम्हाला चांगले माहीत आहे. त्यामुळेच सर्वसामान्य माणसावर चांगले दिवस आले पाहिजे, त्याला चांगले आणि त्यांच्या हक्काचे घर मिळायला हवे हीच महायुती सरकारची भूमिका असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले.

ही घरे एवढ्या लवकर मिळतील यावर अनेकांचा विश्वास बसणे कठीण आहे. मात्र स्थानिक आमदारांनी वेळोवेळी त्यासाठी पाठपुरावा केला. माझ्याकडे तर अनेक आमदार थेट फाइल घेऊन यायचे लोकांना फायदा होणार असेल तर मी तत्काळ त्यावर सही करत असे, कारण गृहनिर्माण आणि नगरविकास अशी दोन्ही खाती माझ्याकडे आहेत. सही करण्यात माझा नंबर पहिला आहे असे मी नाही खुद्द अजितदादा म्हणायचे अशी आठवण यावेळी शिंदे यांनी सांगितली.

आज तुम्ही चाळीतून २ बी एच के घरात राहायला जाताय याचा आनंद मुख्यमंत्री महोदय, सुनेत्राताई आणि इथे बसलेल्या सर्वांनाच आहे असे सांगितले. त्यामुळे गुढीपाडव्याच्या तुम्हाला सगळ्यांना आधीच शुभेच्छा देतो, यंदाची गुढी तुम्हाला नवीन घरात उभारता येणार आहे याचा मला विशेष आनंद असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

विश्वासाचे दुसरे नाव ' म्हाडा ' झाले आहे. अशा कामातून प्राधिकरणाची एक चांगली प्रतिमा तयार झाली असून ती आपण सर्वांनी मिळून जपली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. या प्रकल्पात पोलिसांना देखील आपण घरे दिली आहेत. आधी लग्न करताना विचारायचे मुंबईत राहायला स्वतःचे घर आहे का..? आता ते सांगतील होय २ बीएचके घर आहे. या प्रकल्पात भवानी मातेचे मंदिर बांधण्याची तसेच पार्किंगचा विषय सोडवण्याची मागणी पुढे आली असून त्याबाबत नक्की सकारात्मक निर्णय घेतले जातील असे यावेळी सांगितले.

खरे तर यंदाच्या अर्थसंकल्पात आर्थिक शिस्त लावण्यासाठी कठोर निर्णय घेतले जाईल असे वाटले होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी तशाही परिस्थितीत शेतकऱ्याचे २ लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला. त्यांना खरे तर राज्याचा अर्थव्यवस्थेची नाडी अचूक माहिती आहे मात्र तरीही त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला याबद्दल त्यांचे शिंदे यांनी विशेषत्वाने कौतुक केले.

आपले राज्य हे जीडीपी, एफडीआय आणि पायाभूत सुविधांच्या बाबतीत देशात सगळ्यात आघाडीवर आहे त्यामुळे आपण असे निर्णय घेऊ शकतो असे नमूद केले. म्हाडा प्रमाणे एसआरए मार्फत रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगरचा १७ हजार घरांचा प्रकल्प चालू आहे. तसेच इतरही प्रकल्पांना क्लस्टरच्या माध्यमातून पुनर्विकास करण्यासाठी आपण प्राधान्य देत आहोत, स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ४० लाख झोपडपट्टी वासियाना हक्काचे घर देण्याचे स्वप्न पाहिले होते. आज ७० लाख करोडच्या गुंतवणुकीतून ३० लाख घरांची निर्मिती करून आपण हे स्वप्न पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न करत असल्याचे शिंदे यांनी सांगितले. राज्याच्या गृहनिर्माण धोरणातून ज्येष्ठ नागरिक, डबेवाले, नोकरदार महिला यांनाही घरे देण्याचा प्रयत्न असल्याचे यावेळी नमूद करून सर्वांना पुन्हा एकदा नवीन घरासह गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande