
मुंबई, 16 मार्च (हिं.स.)। सलमान खान याच्या आगामी चित्रपटाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. आधी ‘बॅटल ऑफ गलवान’ या नावाने चर्चेत असलेल्या या चित्रपटाचे नाव आता बदलण्यात आले असून तो आता ‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’ या नव्या नावाने प्रेक्षकांसमोर येणार आहे. चित्रपटाची निर्मिती टीम आणि सलमान खान यांनी अधिकृतपणे या नव्या शीर्षकाची घोषणा केली असून यासोबतच चित्रपटाचे एक दमदार पोस्टरही शेअर करण्यात आले आहे.
या नव्या पोस्टरमधून केवळ चित्रपटाच्या नावातील बदलच जाहीर झाला नाही, तर आजच्या जगासाठी अत्यंत महत्त्वाचा संदेशही देण्यात आला आहे. चित्रपटाची टॅगलाइन “मे वॉर रेस्ट इन पीस” ही विशेष लक्षवेधी ठरत असून युद्धाऐवजी शांततेचा संदेश देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला आहे. सध्याच्या जागतिक परिस्थितीत अनेक ठिकाणी युद्धजन्य वातावरण निर्माण झालेले असताना ही टॅगलाइन शांततेची आशा व्यक्त करणारी असल्याने प्रेक्षकांकडून तिचे कौतुक होत आहे.
‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’ हा चित्रपट गलवान व्हॅली येथे घडलेल्या ऐतिहासिक घटनेपासून प्रेरित असल्याचे सांगितले जात आहे. देशभक्ती आणि सैनिकांच्या शौर्याची कहाणी मांडणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भावनांना भिडणारा ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सलमान खान या चित्रपटातून एक प्रभावी विचार प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असून देशप्रेमासोबतच शांततेचा संदेश देण्यावरही भर दिला आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन अपूर्व लाखिया यांनी केले असून सलमान खान सोबत चित्रांगदा सिंह महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाची अधिकृत रिलीज डेट अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. सुरुवातीला हा चित्रपट एप्रिल २०२६ मध्ये प्रदर्शित होणार होता; मात्र काही कारणांमुळे त्याची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. सध्या मिळालेल्या माहितीनुसार हा चित्रपट १४ ऑगस्ट २०२६ रोजी प्रदर्शित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. देशभक्तीची पार्श्वभूमी आणि दमदार कथा यामुळे ‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’ या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule