
इस्लामाबाद, 16 मार्च (हिं.स.)बांगलादेश दौऱ्यात पाकिस्तानने तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका २-१ अशी गमावली. त्यानंतर पाकिस्तान क्रिकेटवर मोठ्या प्रमाणात टीका झाली आहे. विश्वचषक विजेता पाकिस्तानी क्रिकेटपटू कामरान अकमलने पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) चे अध्यक्ष मोहसिन नकवी यांना लक्ष्य केले आणि विचारले की ते आयसीसी ट्रॉफी देखील चोरतील का. अकमलचे हे विधान नकवी यांच्यावर टीका करणारे होते, जे २०२५ मध्ये भारताने आशिया कप जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेटपटूंनी ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर ट्रॉफी घेऊन पळून गेले होते. भारतीय संघाला अद्याप आशिया कप ट्रॉफी मिळालेली नाही आणि ती अजूनही नकवी यांच्या कार्यालयात आहे.
पाकिस्तानच्या २००९ च्या टी-२० विश्वचषक विजेत्या संघाचा भाग असलेला कामरान अकमल तिसऱ्या एकदिवसीय पराभवानंतर म्हणाला की, परिस्थिती अशी आहे की नेदरलँड्स आमच्याविरुद्ध मालिका खेळू इच्छितात. त्यांनी आम्हाला पराभूत करून कसोटी दर्जा मिळवावा. ही पाकिस्तान क्रिकेटची सध्याची स्थिती आहे. बांगलादेश तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात सहज ३५० धावा करू शकला असता, पण त्यांना केवळ २९० धावाच करता आल्या. लिटन दासने संथ खेळी केली. असे असूनही, पाकिस्तान संघ पराभूत झाला.
कामरान अकमल म्हणाला, जर तुम्ही सामन्यांमध्ये विरोधी संघाला पराभूत करु शकत नसाल, तर तुम्ही आयसीसी ट्रॉफी चोरून घरी आणणार आहात का? तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात, पाकिस्तानचा कर्णधार शाहीन आफ्रिदीने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तन्झिद हसन तमीमच्या १०७ धावांमुळे बांगलादेशने ५० षटकांत ५ बाद २९० धावा केल्या. प्रत्युत्तरात, पाकिस्तान ५० षटकांत २७९ धावांत सर्वबाद झाला. या मालिकेत बांगलादेशचे नेतृत्व मेहदी हसन मिराजने केले.
तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात बांगलादेशने एका रोमांचक सामन्यात पाकिस्तानचा ११ धावांनी पराभव केला आणि मालिका २-१ अशी जिंकली. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने ५० षटकांत २९० धावा केल्या. प्रत्युत्तरात, पाकिस्तान ५० षटकांत फक्त २७९ धावा करू शकला आणि सामना ११ धावांनी गमावला. या विजयासह, बांगलादेशने मालिका २-१ अशी जिंकली. विशेष म्हणजे, पाकिस्तानविरुद्धचा हा एकदिवसीय मालिका विजय बांगलादेशसाठी ११ वर्षांनी आला आहे, जो त्यांच्यासाठी एक मोठी कामगिरी मानली जाते. बांगलादेशने पहिला एकदिवसीय सामना आठ विकेट्सने जिंकला होता. त्यानंतर पाकिस्तानने पुनरागमन केले आणि दुसरा एकदिवसीय सामना १२८ धावांनी जिंकला होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे