लातूर - उदगीरमध्ये हिंदू धर्मसभा उत्साहात; संस्कार, राष्ट्रभावना व जागरूकतेचा संदेश
लातूर, 19 मार्च (हिं.स.)। “हिंदू धर्म वाचवण्यासाठी कोणताही नेता पुढे येणार नाही, प्रत्येकाने स्वतः जबाबदारी स्वीकारून पुढे यावे,” असे ठाम प्रतिपादन प्रख्यात हिंदी व्याख्याते व सनातन संस्कृतीचे अभ्यासक गौतमजी खट्टर यांनी येथे केले. श्रीराम प्रतिष्ठा
उदगीर


लातूर, 19 मार्च (हिं.स.)। “हिंदू धर्म वाचवण्यासाठी कोणताही नेता पुढे येणार नाही, प्रत्येकाने स्वतः जबाबदारी स्वीकारून पुढे यावे,” असे ठाम प्रतिपादन प्रख्यात हिंदी व्याख्याते व सनातन संस्कृतीचे अभ्यासक गौतमजी खट्टर यांनी येथे केले. श्रीराम प्रतिष्ठान ट्रस्ट, उदगीर यांच्या वतीने आयोजित हिंदू धर्मसभेत ते बोलत होते.

शहरातील भागीरथी मंगल कार्यालय, गार्डन येथे झालेल्या या कार्यक्रमाला समविचारी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, माता-भगिनी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेला अभिवादन करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली.

यावेळी नगराध्यक्षा स्वातीताई सचिन हुडे, उपनगराध्यक्षा शिंदे ताई, लातूर येथील समाजसेवक शिवाजीराव पाटील, नगरसेवक गणेश गायकवाड, तसेच श्रीराम प्रतिष्ठान ट्रस्टचे अध्यक्ष सतीश राजेंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान श्रीराम प्रतिष्ठान व विविध संघटनांच्या वतीने गौतमजी खट्टर व भरत आमदापुरे यांचा सत्कार करण्यात आला.

गौतमजी खट्टर यांनी आपल्या प्रभावी भाषणात राष्ट्रभावना, युवा सक्षमीकरण आणि संस्कारांचे महत्त्व अधोरेखित केले. “केवळ भौतिक प्रगती म्हणजे यश नव्हे, तर संस्कारित पिढी घडवणे हेच राष्ट्राचे खरे बळ आहे,” असे ते म्हणाले. सनातन धर्म व संस्कृतीचे रक्षण करणे ही काळाची गरज असल्याचे सांगत त्यांनी तरुणांनी पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावापासून दूर राहून वैदिक परंपरेचा अभिमान बाळगावा, असे आवाहन केले. हिंदू समाजातील जातीभेद विसरून एकजूट निर्माण करण्याची गरज त्यांनी स्पष्ट केली.

यावेळी लेखक व व्याख्याते भरत आमदापुरे यांनी तरुण पिढीला उद्देशून विचारप्रवर्तक मार्गदर्शन केले. केवळ भावनांच्या आहारी न जाता इतिहास आणि वर्तमानाचे भान ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. “आपला खरा शत्रू कोण, हे समजून घेण्यासाठी अज्ञान आणि चुकीच्या इतिहासाचा त्याग केला पाहिजे,” असे ते म्हणाले. एमआयएमसारख्या राजकीय संघटनांचा इतिहास तसेच विविध धर्मांची मूळ शिकवण अभ्यासून ‘सर्वधर्म समभावा’च्या नावाखाली होणारा वैचारिक गोंधळ दूर करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. समाजात फूट पाडणाऱ्या विचारांना ओळखून तरुणांनी आपली वैचारिक बैठक मजबूत करावी, असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीराम प्रतिष्ठान ट्रस्टचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. यामध्ये आशिषजी अंबरखाणे, प्रशांतजी मांगूळकर, अभिजीत पाटील, अजय नवरखेले, शुभम लोणीकर, अनिलजी पुदाले, संतोष फुलारी, सावन टंकसाळे, रक्तदान शिबिर प्रमुख पप्पू गायकवाड, आकाश गवळी यांनीही विशेष योगदान दिले. याशिवाय सुधीर पाटील, निखिल पाटील, राहुल शाह, अविनाश पाटील, पांडुरंग फड, प्रशांत रंगवाळ, आदित्य अरुण कुलकर्णी आदींनी परिश्रम घेतले.

संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध व उत्साही वातावरणात पार पडला असून उपस्थितांनी वक्त्यांच्या विचारांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande