
पुणे, 19 मार्च (हिं.स.)।
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर पुणेकरांनी वाहन खरेदीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गेल्या दहा दिवसांत सुमारे १२ हजार वाहनांची नोंदणी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे झाली आहे. सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले, तर दुचाकी आणि चारचाकी खरेदीत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. पुण्यात दुचाकीबरोबरच चारचाकी वाहनांची संख्या वाढत असल्यामुळे पुणे ‘चारचाकींचे शहर’ अशीही नवी ओळख निर्माण होत आहे.
गुढीपाडवा, अक्षयतृतीया, दिवाळी या महत्वाच्या सणांसह वर्षभर शहरात वाहने खरेदी मोठ्या प्रमाणात केली जातात. पुण्यात दुचाकीबरोबरच चारचाकी वाहनांची संख्या वाढत असल्यामुळे पुणे चारचाकीचे शहर अशी नवीन ओळख निर्माण होऊ लागली आहे. गेल्यावर्षी पाडव्याला सर्वच वाहन खरेदीमध्ये वाढ झाली आहे. २०२५ मध्ये गुढीपाडव्याला १३ हजार १९० वाहनांची खरेदी झाली होती. तर यंदा २०२६ मध्ये गेल्या दहा दिवसांमध्ये ११ हजार ९३७ वाहनांची खरेदी झाली आहे. यामध्ये सात हजार ९८६ दुचाकी आणि दोन हजार ६६० कारची खरेदी झाल्याचे दिसून आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु