नव्या स्टाइल आणि फीचर्ससह ह्युंदाई एक्सटर २०२६ भारतात लाँच
मुंबई, 21 मार्च (हिं.स.)। ह्युंदाई मोटर कंपनीने आपली लोकप्रिय मायक्रो एसयूव्ही ह्युंदाई एक्सटर भारतीय बाजारात अधिक आकर्षक रूपात सादर केली आहे. 2026 एक्स्टर ही कार विशेषतः तरुण ग्राहक आणि कुटुंबीयांना लक्षात घेऊन अपडेट करण्यात आली असून, स्टाइलिंग, आ
Hyundai Exter


मुंबई, 21 मार्च (हिं.स.)। ह्युंदाई मोटर कंपनीने आपली लोकप्रिय मायक्रो एसयूव्ही ह्युंदाई एक्सटर भारतीय बाजारात अधिक आकर्षक रूपात सादर केली आहे. 2026 एक्स्टर ही कार विशेषतः तरुण ग्राहक आणि कुटुंबीयांना लक्षात घेऊन अपडेट करण्यात आली असून, स्टाइलिंग, आराम आणि आधुनिक फीचर्सवर यावेळी कंपनीने अधिक भर दिला आहे. या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 5.80 लाख रुपये ठेवण्यात आली असून, टॉप व्हेरियंटची किंमत 9.42 लाख रुपयांपर्यंत जाते. बाजारात ही कार थेट टाटा पंचला टक्कर देणार असल्याचं मानलं जात आहे.

नवीन एक्स्टरच्या डिझाइनमध्ये सूक्ष्म पण महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. समोरील भागात डार्क फिनिशसह नव्या ग्रिल डिझाइनमुळे कार अधिक प्रीमियम दिसते. सेंटर गार्निशमध्येही बदल करण्यात आले आहेत. 15 इंचाचे नवीन अलॉय व्हील्स, मोठा रियर स्पॉयलर, अपडेटेड टेलगेट आणि सी-पिलर गार्निशमुळे गाडीचा एकूण लुक अधिक स्पोर्टी आणि आधुनिक झाला आहे. 1,643 मिमी उंचीसह ही आपल्या सेगमेंटमधील सर्वात उंच कार ठरली असून, त्यामुळे रस्त्यावर तिची उपस्थिती अधिक उठून दिसते. रंग पर्यायांमध्येही वाढ करण्यात आली आहे. एकूण 7 मोनोटोन आणि 1 ड्युअल टोन रंगांसह गोल्डन ब्रॉन्झ आणि टिटॅनियम ब्लॅक मॅट हे नवीन पर्याय जोडले गेले आहेत, जे गाडीला अधिक स्टायलिश आणि युवा लुक देतात.

इंटिरियरमध्येही मोठे बदल पाहायला मिळतात. ड्युअल-टोन नेव्ही आणि ग्रे थीममुळे केबिनला प्रीमियम फील मिळतो. कार्बन-पॅटर्न डॅशबोर्डला 3D फिनिश देण्यात आली आहे. याशिवाय डी-कट स्टीअरिंग व्हील, मेटल पेडल्स आणि फोल्डिंग ड्रायव्हर आर्मरेस्ट यांसारख्या सुविधा प्रवास अधिक आरामदायक करतात. 391 लिटर बूट स्पेस कायम ठेवण्यात आली असून, रोजच्या वापरासाठी ती पुरेशी आहे. एकूणच केबिन अधिक आधुनिक, प्रशस्त आणि सोयीस्कर बनवण्यात आला आहे.

फीचर्सच्या बाबतीत 2026 एक्स्टर अधिक स्मार्ट झाली आहे. सेगमेंटमधील पहिल्यांदाच डॅशकॅम देण्यात आली आहे. यासोबत वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले, रिअर सीटसाठी टाइप-सी यूएसबी पोर्ट, 60 पेक्षा जास्त कनेक्टेड फीचर्ससह ब्लुलिंक आणि 300 पेक्षा जास्त इंटरनेटशिवाय काम करणारे व्हॉइस कमांड्स यांचा समावेश आहे. हे सर्व फीचर्स कारला तंत्रज्ञानाच्या बाबतीत अधिक प्रगत बनवतात.

मात्र, मेकॅनिकल भागांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. कारमध्ये पूर्वीप्रमाणेच 1.2 लिटर चार-सिलिंडर पेट्रोल इंजिन दिलं आहे, ज्यासोबत सीएनजीचा पर्यायही उपलब्ध आहे. मॅन्युअल आणि एएमटी ट्रान्समिशनचे पर्याय ग्राहकांना मिळतात. सीएनजी व्हेरियंटमध्ये 225 लिटर क्षमतेचे ड्युअल सिलिंडर्स देण्यात आले आहेत. यामुळे इंधन बचत आणि परफॉर्मन्स यामध्ये संतुलन राखण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande