
- 10 एप्रिलपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन
लातूर, 23 मार्च (हिं.स.)।
राज्याचे युवा धोरण 2012 अंतर्गत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्यावतीने शासन निर्णय 12 नोव्हेंबर, 2013 अन्वये जिल्ह्यात कार्यरत असलेल्या युवक, युवतींना व नोंदणीकृत संस्थांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा आणि युवा विकासाचे कार्य करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा युवा पुरस्कार दरवर्षी दिला जातो.
युवक, युवतीसाठी पुरस्काराचे स्वरुप गौरव पत्र, सन्मानचिन्ह, रोख पुरस्कार रुपये 10 हजार व संस्थेसाठी गौरवपत्र, सन्मानचिन्ह, रोख पुरस्कार रुपये 50 हजार असे आहे.
यासाठी जिल्ह्यातील युवक, युवती तसेच नोंदणीकृत संस्थांकडून जिल्हा युवा पुरस्कार 2025-26 वर्षाच्या युवा पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येत असून अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 10 एप्रिल 2026 अशी आहे. यासाठीचे अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातून प्राप्त करुन घ्यावेत व अधिक माहितीसाठी जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयात क्रीडाधिकारी बाबासाहेब इंगोले यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन लातूर येथील जिल्हा क्रिडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis