
नांदेड, 23 मार्च (हिं.स.)।
सगरोळी येथील शासकीय वाळू डेपोतील चार हजार १६७ ब्रास शिल्लक वाळू साठ्याचा लिलाव मंगळवारी बिलोलीतील उपविभागीय अधिकारी कार्यालयात होणार आहे. शासकीय दरानुसार तीस लाख रुपये किमतीची वाळू मिळवण्यासाठी मातब्बर ठेकेदारांमध्ये मोर्चेबांधणी सुरू आहे. शासकीय डेपोतील वाळू साठ्याचा जाहीर लिलाव उपजिल्हाधिकारी क्रांती डोंबे यांच्या उपस्थितीत दुपारी बाराला पार पडणार आहे. लिलावासंदर्भातील अटी व शर्ती प्रशासनाकडून जाहीर केल्या आहेत. ज्यांना लिलावात भाग घ्यावयाचा आहे, त्यांनी अटी-शर्तीचे व नियमांचे पालन करून वाळू खरेदी करावी, असे आवाहन उपजिल्हाधिकारी डोंबे यांनी केले आहे
वाळू लिलावाच्या अटी-शर्ती व नियम जाहीर प्रकटनाद्वारे कळविण्यात आल्या आहेत. शासकीय दराप्रमाणे ७१७ रुपये प्रतिब्रास हातची किंमत असून, लिलावात ज्यांची बोली अधिक असेल त्यांना नियमानुसार वाळू दिली जाणार आहे. लिलावधारकांनी लिलावात सहभागी होण्यापूर्वी जागेवर जाऊन प्रत्यक्ष वाळूची पाहणी करूनच लिलावात भाग घ्यावा.
शासकीय वाळू डेपोतील शिल्लक साठ्याचा जाहीर लिलाव पहिल्यांदाच होत आहे. सगरोळी येथील डेपो क्रमांक एकमधून अमाप वाळू उत्खनन करण्यात आले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis