
रत्नागिरी, 24 मार्च, (हिं. स.) : मुंबई–गोवा दरम्यान कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मुंबई सीएसएमटी ते मडगाव दरम्यान ३ आणि ५ एप्रिल २०२६ रोजी विशेष गाड्या धावणार आहेत.
मुंबईहून सुटणारी ही विशेष गाडी मध्यरात्री ००:२० वाजता प्रवास सुरू करून त्याच दिवशी दुपारी १५:१५ वाजता मडगाव येथे पोहोचणार आहे. मडगावहून परतीच्या प्रवासासाठी ही गाडी दुपारी १६:०० वाजता सुटून पुढील दिवशी पहाटे ०३:४५ वाजता मुंबईत दाखल होणार आहे. या वेळापत्रकामुळे दोन्ही बाजूंनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सोयीस्कर पर्याय उपलब्ध होणार आहे.
या विशेष गाडीला दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी आणि करमळी हे थांबे आहेत.
या विशेष गाडीचे आरक्षण आज सुरू झाले असून, प्रवासी सर्व आरक्षण केंद्रांवर तसेच IRCTC च्या अधिकृत संकेतस्थळावरून तिकीट बुक करता येईल. गाडीला एकूण २२ डबे असणार असून त्यामध्ये एसी २ टायर, एसी ३ टायर, स्लीपर आणि जनरल डब्यांचा समावेश आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी