
कोल्हापूर, 24 मार्च, (हिं.स.)। कोल्हापूर शहर आणि परिसरात एका बाजूला जिल्हा प्रशासन गॅस आणि पेट्रोलची टंचाई नसल्याचे सांगत असताना प्रत्यक्ष मात्र जिल्हयात सर्वत्र गॅस आणि पेट्रोल मिळवण्यासाठी मोठमोठ्या रांगा लागत आहेत. आज पहाटे ४ वाजल्यापासून गॅस सिलिंडर घेऊन नागरिक रांगेत उभे असताना सकाळी 11 वाजल्यापासून काही पेट्रोल पंप पेट्रोल संपल्याने बंद झाले आणि उपलब्ध असलेल्या काही पंपावर वाहन धारकांच्या रांगा लागल्या. यामुळे जिल्हयात अनागोंदी माजली.
जिल्ह्यात पेट्रोलचा पुरवठा पुरेसा असून नागरिकांनी विनाकारण पेट्रोल पंपावर गर्दी करू नये. पेट्रोल आणि डिझेलच्या कमतरते विषयी अफवा असल्याचंही स्पष्टीकरण जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिलं.
पेट्रोल आणि डिझेलसाठी सकाळपासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातून पेट्रोल पंपांवर रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं. पेट्रोल डिझेल मिळणार नाही या शक्यतेनं नागरिकांनी पेट्रोल पंपांवर सुमारे दीड किलोमीटर रांगा लावल्या होत्या.
आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या इराण-अमेरिका-इस्राईल देशांमधील युद्धाचा परिणाम घरगुती गॅस पुरवठ्यावरही झाला, घरगुती गॅससाठी नागरिकांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आली. मात्र जिल्हा प्रशासनाने यासाठी पुढाकार घेत सर्व खासगी गॅस पुरवठा करणाऱ्या एजन्सीशी उत्तम समन्वय ठेवून जिल्ह्यात घरगुती गॅससाठी उडालेला गोंधळ काही प्रमाणात कमी करण्याचा प्रयत्न केला. सोमवारी सायंकाळी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेल संपल्याचे फलक लागले आणि हे लोण जिल्हाभर पसरले. गारगोटी, कागलसह कोल्हापूर जिल्ह्यातील साने गुरुजी वसाहत परिसर, फुलेवाडी या परिसरातील पेट्रोल पंपांवर नागरिकांनी सुमारे दीड किलोमीटर रांगा लावल्याचं चित्र पाहायला मिळालं. पेट्रोल-डिझेलसाठी ऐनवेळी धावाधाव नको म्हणून अनेकांनी हातातील कामधंदे सोडून पेट्रोल-डिझेलसाठी रांगा लावल्या. मात्र जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी तातडीने माध्यमांशी संवाद साधत कोल्हापूरकरांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे.
जिल्ह्यात विविध पेट्रोल वितरक कंपन्यांचे 300 हून अधिक पेट्रोल-डिझेल पंप आहेत. पेट्रोल पंप चालकांना यापूर्वी क्रेडिटवर पेट्रोलचा साठा दिला जायचा. मात्र गेल्या 2 दिवसात पेट्रोल वितरण करणाऱ्या कंपन्यांनी या नियमात बदल केल्याचं सांगण्यात येत आहे. एचपीसीएल कंपनीचे जिल्ह्यात 130 पेट्रोल पंप आहेत. या पंपांवरून सोमवारपर्यंत 240 किलोलीटर पेट्रोल आणि 290 किलोलीटर डिझेल विकलं गेलं आहे. मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरलेल्या अफवेनंतर या परिस्थितीत तातडीने बदल होऊन हीच विक्री 300 किलोलीटर पर्यंत गेली. याचाच अर्थ जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपावर मागणी तसा पुरवठा सुरळीत सुरू आहे या सर्व व्यवस्थेवर जिल्हा प्रशासन लक्ष ठेवून असून कोणत्याही अफवेला नागरिकांनी बळी पडू नये, असं आवाहन जिल्हाधिकारी येडगे यांनी यावेळी केलं. तरीही वाहनधारकांच्या पेट्रोल पंपावरील रांगा कमी झाल्या नाहीत. उलट कामावरून घरी परत जाणारा प्रत्येक वाहनधारकाने पेट्रोल पंपाकडे धाव घेतली. यामध्ये संभाव्य टंचाईची भीती आणि पुढील तजवीज हीच लोकांची मानसीकता दिसून आली. यामुळे प्रशासकीय यंत्रणा मात्र हतबल झाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar