
नवी दिल्ली , 27 मार्च (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. भारत-अमेरिका द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत होतील असा विश्वास व्यक्त करत ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदी यांना काम पूर्ण करणारे नेता असे संबोधले.
भारतातील अमेरिकन दूतावासाने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या त्या वक्तव्याची माहिती शेअर केली, ज्यामध्ये त्यांनी पंतप्रधान मोदींची प्रशंसा केली होती. अमेरिकन दूतावासाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ट्रम्प यांचे विधान शेअर करत लिहिले, “भारतासोबतचे आमचे उत्कृष्ट संबंध भविष्यात आणखी मजबूत होतील. पंतप्रधान मोदी आणि मी — आम्ही दोघेही काम पूर्णत्वाला नेणारे लोक आहोत, जे बहुतेक लोकांबद्दल म्हणता येत नाही.” मध्य पूर्वेत तणाव शिगेला पोहोचलेला असताना आणि भारत-अमेरिका यांच्यात इराण वाद तसेच होर्मुज सामुद्रधुनीच्या सुरक्षेसारख्या महत्त्वाच्या जागतिक मुद्द्यांवर चर्चा सुरू असताना ट्रम्प यांची ही प्रतिक्रिया समोर आली आहे.
दरम्यान, गेल्या मंगळवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवर संवाद साधला होता. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियावर लिहिले, “राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी मला फोन केला आणि पश्चिम आशियातील परिस्थितीवर आमची उपयुक्त चर्चा झाली. भारत तेथील तणाव शक्य तितक्या लवकर कमी करून शांतता प्रस्थापित करण्यास समर्थन देतो. होर्मुज सामुद्रधुनी खुली, सुरक्षित आणि सर्वांसाठी सुलभ राहणे संपूर्ण जगासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. शांतता आणि स्थैर्यासाठीच्या प्रयत्नांबाबत संपर्कात राहण्यावर आम्ही सहमती दर्शवली.”
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode