
कोल्हापूर, 29 मार्च (हिं.स.)। महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीच्या ५७ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय कृषी महाविद्यालय, कोल्हापूर येथे विविध नूतन इमारतींचे लोकार्पण आणि पाहणी दौरा संपन्न झाला. राज्याचे कृषीमंत्री तथा विद्यापीठाचे प्रतिकूलपती दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते या विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना, महाविद्यालयातील आधुनिक भौतिक सुविधांचा लाभ घेऊन स्वतःचे भविष्य घडवण्याचे आणि कृषी तंत्रज्ञान संशोधक म्हणून कृषी क्षेत्राला नवी दिशा देण्याचे आवाहन केले.
आपल्या भाषणात मंत्री भरणे यांनी कृषी महाविद्यालयातील विद्यार्थिनींच्या लक्षणीय उपस्थितीबद्दल विशेष आनंद व्यक्त केला. बदलत्या काळात मुलींचा या क्षेत्रातील वाढता सहभाग हा कृषी क्षेत्राच्या प्रगतीसाठी सकारात्मक संकेत असल्याचे त्यांनी नमूद केले. स्वतःच्या शेतीतील आठवणींना उजाळा देत त्यांनी विद्यार्थ्यांना 'आनंद द्या आणि आनंद घ्या' हा यशाचा मूलमंत्र दिला. घरातील थोरामोठ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी जिद्दीने अभ्यास करा आणि उद्याचे कृषी तंत्रज्ञान संशोधक म्हणून देशाच्या उत्पादन वाढीत योगदान द्या, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कृषीमंत्र्यांनी यावेळी राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी निर्णयांची माहिती दिली. कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर करून महाराष्ट्र हे देशात आघाडीचे राज्य ठरल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांसाठी राबवलेली कर्जमाफी, वीज बिल माफी आणि 'नमो शेतकरी सन्मान निधी'च्या माध्यमातून शासनाची शेतकऱ्यांप्रती असलेली कटिबद्धता दिसून येते, असे ते म्हणाले. विद्यार्थ्यांनी या शासकीय योजनांची माहिती सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून कृषी विभागाच्या जनजगृती मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन केले. याचवेळी त्यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कृषी क्षेत्रातील योगदानाचेही स्मरण केले.
कार्यक्रमादरम्यान कृषीमंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल घेत, येत्या १० दिवसांत मुलांच्या नवीन वसतिगृहास मंजुरी देण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमापूर्वी त्यांनी महत्त्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन व पाहणी केली. यावेळी राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि महात्मा फुले यांच्या पुतळ्यांचे पूजन करून नियोजित मुख्य प्रशासकीय इमारत आणि सभागृहाची पाहणी केली. मुख्य प्रवेशद्वाराजवळील कृषी निविष्ठा उत्पादने व विक्री केंद्राचे उद्घाटन व उद्यानविद्या विभागांतर्गत 'हायड्रोपोनिक्स' प्रकल्पाचे लोकार्पण, शेतकरी कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र आणि नवीन विद्यार्थिनी वसतिगृहाचे उद्घाटन तसेच नियोजित अतिथीगृह इमारतीची पाहणी केली.
या प्रसंगी कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी राहुरी विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयांतून विकसित होत असलेल्या आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सहयोगी अधिष्ठाता डॉ. शैलेंद्र कांबळे यांनी मानले. सूत्रसंचालन डॉ. आनंद चवाई यांनी केले. कृषी मंत्र्यांच्या हस्ते केंद्रीय कृषि मंत्री पुरस्कार प्राप्त शेतकरी तसेच ७ विविध संशोधन केंद्र व कोल्हापूर विभागतील सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
या सोहळ्याला जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तुषार पवार, कार्यकारी परिषद सदस्य दत्तात्रय उगले, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाने, संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके, विद्यापीठ अभियंता मिलिंद ढोके, सहयोगी अधिष्ठाता, शासकीय कृषी महाविद्यालय, कराड डॉ. इंदिरा घोनमोडे, सहयोगी संशोधन संचालक, शेंडा पार्क, कोल्हापूर डॉ. सुनील कराडे, प्रभारी देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र पुणे डॉ. सोमनाथ माने, लोकप्रतिनिधी आदिल फरास, बाबासाहेब पाटील, अरुण डोंगळे तसेच कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, सुनील कराडे यांच्यासह शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे सदस्य, शेतकरी, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar