
अमरावती, 29 मार्च, (हिं.स.) मोर्शी तालुका प्रतिनिधी : ड्राय झोनमध्ये असलेल्या मोर्शी तालुक्यात भीषण दुष्काळातून अथक परिश्रम घेऊन जगवलेल्या संत्रा बागांवर बदलत्या वातावरणाने अज्ञात रोगाचे सावट आल्याचे दिसत आहे. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे संत्रा गळती, संत्रा झाडांची पाने पिवडी पडून संत्रा झाडे वाळत चालली आहे. यावर सर्व उपाययोजना करून काही उपयोग होत नसल्याने संत्रा उत्पादक शेतकरी हैराण झाले आहेत. यामुळे संत्राबागा वाचविण्याचे आव्हान संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. संशोधकांनी व कृषी विभागाने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष रुपेश वाळके यांनी कृषी विभागाकडे केली आहे.
मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकरी सध्या अनेक संकटाचा सामना करत आहेत. वाढत्या तापमानामुळे संत्रा ‘आंबिया बहार’ पूर्णपणे धोक्यात आला असून मोठ्या प्रमाणावर फळगळ सुरू आहे. मात्र या गंभीर परिस्थितीत कृषी विभाग आणि केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेच्या संशोधकांचे स्पष्ट दुर्लक्ष होत असल्याचा संताप संत्रा उत्पादक शेतकऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.मार्च महिन्यापासून तापमानाने 40 अंश सेल्सियसचा टप्पा ओलांडला आहे. उष्ण वारे आणि पाण्याची टंचाई यामुळे संत्रा झाडांवर प्रचंड ताण निर्माण झाला असून 50 टक्क्यांपर्यंत फळगळ झाली आहे. परिणामी शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असतांना प्रशासन मात्र निष्क्रिय असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष रुपेश वाळके यांनी केला आहे. दरवर्षी अशा संकटाच्या वेळी तात्काळ मार्गदर्शन व उपाययोजना अपेक्षित असतात. परंतु यंदा कृषी विभागाकडून कोणतेही प्रभावी मार्गदर्शन मिळाले नाही. तसेच संत्रा संशोधन करणाऱ्या संस्थांनीही वेळेवर योग्य उपाययोजना किंवा सूचना न दिल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे.
शेतकरी मरत असताना अधिकारी आणि संशोधक केवळ कागदोपत्री कामात व्यस्त आहेत का? असा संतप्त सवाल संत्रा उत्पादक शेतकरी उपस्थित करत आहेत. लाखो हेक्टरवरील संत्रा बागा धोक्यात असतांना ना प्रत्यक्ष पाहणी, ना तातडीची उपाययोजना—यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.शासनाने तात्काळ या प्रकरणात लक्ष घालून कृषी विभाग व संबंधित संशोधकांची जबाबदारी निश्चित करावी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई जाहीर करावी आणि तज्ञांकडून तातडीने मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे, अन्यथा संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रुपेश वाळके यांनी प्रशासनाला दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी