
लातूर, 29 मार्च (हिं.स.)।
जिल्हाधिकारी लातूर व पोलीस प्रशासनाने ध्वनीक्षेपकाबाबत दिलेल्या आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अहमदपूर पोलिसांनी शिरूर ताजबंद येथील दोन व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. श्रीराम जन्मोत्सव समितीच्या मिरवणुकीत मर्यादेपेक्षा जास्त आवाजाचा वापर केल्याने ही कारवाई करण्यात आली.
दिनांक २६ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास शिरूर ताजबंद येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात श्रीराम जन्मोत्सवाची मिरवणूक सुरू होती. यावेळी समितीच्या वतीने लावण्यात आलेल्या ध्वनीक्षेपकाचा (साऊंड सिस्टम) आवाज प्रशासनाने ठरवून दिलेल्या मानद मर्यादेपेक्षा अधिक असल्याचे निदर्शनास आले. पोलीस उपनिरीक्षक स्मिता दिलीपराव जाधव यांनी घटनास्थळी पाहणी केली असता, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग होत असल्याचे दिसून आले.
याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक स्मिता जाधव यांनी स्वतः फिर्यादी होऊन अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. १. श्याम बालाजी पवार (रा. शिरूर ताजबंद) २. अमोल वीरभद्र स्वामी (रा. शिरूर ताजबंद) या दोघांविरूध्द भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २२३ आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक १५४/२०२६ नुसार नोंद करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार साळवे (ब.नं. ६२४) या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे सर्वांनी पालन करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis