
बीड, 29 मार्च (हिं.स.)।
गेवराई येथील आगारातून अनेक वर्षांपासून नियमित सुरु असलेली गेवराई भिवंडी बस मागील काही दिवसांपासून बंद करण्यात आल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.
येथील आगारातून सकाळी सव्वा आठ वाजता सुटणारी ही बस पाडळशिंगी, मादळमोही, कोळगाव, तिंतरवणी, पाथर्डी, अहिल्यानगर मार्गे भिवंडीपर्यंत जात होती. या मार्गावरील शेकडो प्रवाशांसाठी ही बस अत्यंत महत्त्वाची होती.
अहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचारासाठी जाणारे रुग्ण, कामानिमित्त प्रवास करणारे नागरिक, विद्यार्थी यांच्यासाठी ही बस सोयीची होती. मागील चार-पाच दिवसांपासून ही बससेवा बंद करण्यात आल्याने प्रवाशांचे हाल सुरू झाले आहेत.
मुळात या मार्गावर आधीच बससेवा कमी असताना वर्षानुवर्षे नियमित सुरु असलेली गेवराई-भिवंडी बस अचानक बंद झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. तरी ही बससेवा पूर्ववत सुरु करण्याची मागणी होत आहे.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis