

रायगड, 29 मार्च (हिं.स.)। मतदार यादी अधिक अचूक आणि पारदर्शक करण्यासाठी ‘SIR महाराष्ट्र 2026’ अंतर्गत नेरळ येथे बूथ क्रमांक 3 साठी विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. या कॅम्पद्वारे ‘Mapping & Progeny’ आणि ‘Enumeration’ या दोन टप्प्यांत प्रक्रिया राबविण्यात येणार असून नागरिकांनी वेळेत सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पहिल्या टप्प्यात 2002 च्या मतदार यादीतील नावे सध्याच्या मतदारांशी जोडण्याची (Mapping) तसेच त्या यादीत नसलेल्या कुटुंबातील सदस्यांची ‘Progeny’ म्हणून नोंद करण्याची प्रक्रिया केली जाणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ‘Unmapped’ राहिलेल्या नागरिकांसाठी स्वतंत्र Enumeration फॉर्म भरून त्यांची नोंदणी केली जाईल.
या प्रक्रियेसाठी नागरिकांकडून जन्मतारीख, पालकांची माहिती तसेच आवश्यक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे. जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, पासपोर्ट, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स यांसारखी कागदपत्रे ग्राह्य धरली जाणार आहेत. चुकीची किंवा अपूर्ण माहिती दिल्यास नाव वगळले जाण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी दक्ष राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
“ही केवळ कागदी प्रक्रिया नसून मतदानाच्या हक्काशी थेट संबंधित आहे. नागरिकांनी दुर्लक्ष केल्यास भविष्यात मतदानापासून वंचित राहण्याचा धोका आहे,” असा स्पष्ट इशारा आयोजकांकडून देण्यात आला आहे.
हा कॅम्प 29 मार्च 2026 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 4 या वेळेत अमान कॉम्प्लेक्स, खांडा रस्ता, नेरळ येथे पार पडणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली नोंदणी अचूक करून घ्यावी, असे आवाहन तौफिक मुल्ला, फैसल मुल्ला आणि संजय घाटे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)