
बीड, 29 मार्च (हिं.स.)।राज्याच्या पशुसंवर्धन, पर्यावरण आणि हवाबदल मंत्री पंकजा मुंडे यांच्या अंबाजोगाई येथील भव्य जनसंपर्क कार्यालयाचे अत्यंत उत्साहात उद्घाटन झाले. आपल्या आजोळी या कार्यालयाचे लोकार्पण करताना पंकजा मुंडे भावूक झाल्या होत्या. सत्ता असो वा नसो, सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन, असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
अंबाजोगाईतील प्रशांत नगर भागात हे कार्यालय सुरू करण्यात आले असून, यामुळे स्थानिकांना आता आपल्या कामांसाठी मुंबई किंवा परळीला जाण्याची आवश्यकता उरणार नाही. या सोहळ्याला गेवराईच्या नगराध्यक्षा गीता पवार, युवा नेते अक्षय मुंदडा, युद्धजित पंडित, भाजप जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. हे कार्यालय केवळ इमारत नसून सामान्य माणसाच्या तक्रारी निवारणाचे केंद्र असेल, असे मुंडे यांनी स्पष्ट केले.
तंत्रज्ञानाचा वापर करून 'जनता दरबार'च्या माध्यमातून लोकांच्या समस्या थेट जाणून घेण्यावर त्यांनी भर दिला. रेल्वे आणि महामार्गांच्या प्रकल्पांसह जिल्ह्याचा विकास निरंतर सुरू ठेवण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis