
पालघर, 31 मार्च, (हिं.स.)। वसई-विरार महानगरपालिका हद्दीत पावसाळ्यात वारंवार उद्भवणारी पूरस्थिती टाळण्यासाठी प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. शहरातील मोठ्या नाल्यांमधील पाण्याचा निचरा सुरळीत न झाल्याने दरवर्षी पूरस्थिती निर्माण होते. या पार्श्वभूमीवर नाल्यांवरील अतिक्रमणे हटविण्यासोबतच ‘गायब’ झालेल्या नाल्यांचा शोध घेण्यासाठी संपूर्ण शहरात सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
गेल्या काही वर्षांत पावसाळ्यात शहरातील अनेक भागांत मोठ्या प्रमाणात पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले होते. नालेसफाईसाठी दरवर्षी कोट्यवधींचा खर्च केला जात असतानाही परिस्थितीत फारसा बदल होत नसल्याने नागरिकांसह नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सोमवारी झालेल्या महासभेत या मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाली. यावेळी अनेक नगरसेवकांनी नाल्यांवरील अतिक्रमणामुळे नाले अरुंद झाल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यामुळे पाण्याच्या निचऱ्यात अडथळे निर्माण होत असल्याने पूरस्थिती गंभीर होत असल्याचे त्यांनी सांगितले. नैसर्गिक नाले मोकळे करून त्यांचे रुंदीकरण करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
महापौर अजीव पाटील यांनी नालेसफाईच्या कामात कोणतीही हलगर्जीपणा सहन केला जाणार नसल्याचा इशारा दिला. विकास आराखड्यात नमूद असलेल्या नाल्यांतील गाळ काढून नाले रुंद करण्यात येणार असून अतिक्रमणे हटवून नाल्यांचे खोलीकरणही केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
याशिवाय, जुन्या गटारांमधील गाळ काढणे, नव्याने बांधण्यात येणाऱ्या गटारांची गुणवत्ता तपासणे आणि निधीचा अपव्यय टाळण्यासाठी तज्ज्ञ सल्लागार नियुक्त करण्याचेही सुचविण्यात आले. शहरातील २६३ ठिकाणी नवीन गटारे बांधण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला असून पावसाळ्यापूर्वी प्राथमिक कामे पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL