
डोंबिवली, 31 मार्च, (हिं.स.)। कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनातर्फे पूर्वेकडील रेल्वे स्थानक जवळील रस्त्यावरील फेरीवाल्यांवर गेल्या महिन्यापासून धडक कारवाई करण्यात येत आहे. त्यांचे सामानही जप्त करण्यात येत आहे. परिणामी फेरीवाल्यांना आपला उदरनिर्वाहासाठी व्यवसाय करता येत नाही. त्यांची उपासमार होत आहे. या त्रासाला कंटाळून मंगळवारी शेकडो फेरीवाल्यांनी महापालिकेच्या कारवाई विरोधात फ प्रभागक्षेत्र कार्यालयावर धडक मोर्चा काढून पालिका अधिकारी प्रसाद ठाकूर यांना मागण्यांचे निवेदन दिले.
कष्टकरी हॉकर्स व भाजी विक्रेता अध्यक्ष बबन कांबळे, भाऊ पाटील, राजू गुप्ता, अरुण पाटील, अभय दुबे, रणदिवे, आशा मगरे, पांडुरंग जाधव, रेश्मा, मुन्नाभाई समवेत असलेल्या शिष्टमंडळाने फ प्रभागक्षेत्र अधिकारी प्रसाद ठाकूर यांची भेट घेतली.
यापूर्वी हातात आपल्या मागणीचे फलक घेत फेरीवाल्यांचा मोर्चा बाजीप्रभु चौकात पोलिसांनी अडविला. दरम्यान पथ विक्रेता कायदा 2014 कायदा लागू करण्याची मागणी फेरीवाले करीत होते. पोराबाळांचे पोट भरण्यासाठी आणि कुटुंबाला वाचविण्यासाठी आम्हाला अडवू नका. नाहीतर आम्हाला आत्महत्या कराव्या लागतील असेही यावेळी फेरीवाले सांगत होते.
या मोर्च्याबाबत अधिकारी प्रसाद ठाकूर यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, फेरीवाल्यांचे शिष्टमंडळ आमच्याकडे आले होते. त्यांनी आम्हाला निवेदन दिले आहे. हे निवेदन वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवणार आहोत. आठ दिवसात संबंधित अधिकारी याविषयी त्यांच्या शिष्टमंडळाबरोबर या विषयावर चर्चा करतील असेही ठाकूर यांनी सांगितले.
हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi