
नवी दिल्ली, 04 मार्च (हिं.स.) - भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला रांचीमध्ये भरधाव गाडी चालवल्याबद्दल १,००० दंड ठोठावण्यात आला आहे. शहरातील वाहतूक देखरेख यंत्रणेने त्याच्या वाहनाने वेगमर्यादा ओलांडल्याची नोंद केली होती, त्यानंतर मोटार वाहन कायद्याच्या कलम १८३ अंतर्गत ई-चलान जारी करण्यात आले. ही घटना त्याच्या निवासस्थानाजवळ घडल्याची माहिती आहे.
झारखंड राज्य गृहनिर्माण मंडळाने निवासी भूखंडाचा गैरवापर केल्याच्या आरोपाखाली धोनीला नोटीस बजावल्यानंतर काही दिवसांतच ही अतिवेगाने गाडी चालवण्याची घटना घडली. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, हर्मू रोडवरील भूखंड केवळ निवासी वापरासाठी देण्यात आला होता. पण तेथे व्यावसायिक क्रियाकलापांबद्दल चिंता आहे. रिंग रोडवरील त्याच्या सध्याच्या निवासस्थानी जाण्यापूर्वी धोनी पूर्वी जिथे राहत होता तेच हे ठिकाण आहे.
या सर्वांमध्ये धोनी आता क्रिकेटवर लक्ष केंद्रित करत असल्याचे दिसून येते. त्याने चेन्नई सुपर किंग्जसोबत आयपीएल २०२६ ची तयारी आधीच सुरू केली आहे आणि नेटमध्ये सराव सुरू केला आहे. पाच वेळा विजेत्या चेन्नई सुपर किंग्जचा २०२५ चा हंगाम निराशाजनक राहिला, १४ पैकी १० सामने गमावले आणि त्यांना पॉइंट टेबलमध्ये तळाशी स्थान मिळाले. नवीन हंगामात धोनीला जोरदार पुनरागमनाची आशा आहे. अनकॅप्ड क्रिकेटपटूंच्या नियमांनुसार धोनीला ४ कोटी रुपयांना संघात कायम ठेवण्यात आले आहे. गेल्या हंगामात त्याने १४ सामन्यांमध्ये १९६ धावा केल्या आणि १३५.१७ च्या स्ट्राईक रेटने जलद खेळी केल्या होत्या.
४४ वर्षांच्या असतानाही, धोनीची धोरणात्मक समज आणि ड्रेसिंग रूमवरील नियंत्रण संघासाठी महत्त्वाचे मानले जाते. तो आता वरच्या क्रमाने फलंदाजी करत नसला तरी, शेवटच्या षटकांमध्ये त्याची भूमिका महत्त्वाची ठरते.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे