
मुंबई, 06 मार्च (हिं.स.)। आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून क्रिकेटप्रेमींचे लक्ष अंतिम सामन्याकडे लागले आहे. उपांत्य फेरीत इंग्लंडचा पराभव करत भारताने सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्यामुळे आता विजेतेपदाच्या लढतीत भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. हा बहुप्रतिक्षित सामना ८ मार्च रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. अंतिम सामन्याबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत असून तिकीटांपासून ते स्टेडियममध्ये प्रवेशाच्या नियमांपर्यंत सर्व माहिती जाणून घेण्याची उत्सुकता वाढली आहे.
अंतिम सामन्याची तिकिटे अधिकृतपणे ‘बुक माय शो’ आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावरून विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहेत. सामन्याची प्रचंड मागणी असल्यामुळे बहुतांश तिकीट श्रेणी आधीच संपल्याचे दिसत आहे. मात्र ज्यांना अद्याप तिकीट मिळालेले नाही त्यांच्यासाठी अजूनही आशा कायम आहे. मोठ्या सामन्यांपूर्वी साधारणपणे चोवीस ते अठ्ठेचाळीस तास आधी काही तिकिटे पुन्हा विक्रीसाठी उपलब्ध केली जातात. मुंबईत झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यावेळीही असेच घडले होते. त्यामुळे चाहत्यांनी अधिकृत संकेतस्थळ किंवा अॅपवर लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
तिकीटांच्या किमतींबाबत बोलायचे झाल्यास स्टेडियममधील वरच्या प्रेक्षक गॅलरीसाठी तिकीटांची सुरुवातीची किंमत सुमारे तीन हजार रुपयांपासून सुरू होते. तर प्रीमियम आसनव्यवस्था, हॉस्पिटॅलिटी आणि क्लब लाउंजसाठी तिकीटांची किंमत पन्नास हजार ते पंच्याहत्तर हजार रुपयांपर्यंत असल्याची माहिती मिळत आहे.
अंतिम सामन्यासाठी सुरक्षा व्यवस्थाही अत्यंत कडक ठेवण्यात आली आहे. स्टेडियमची प्रवेशद्वारे दुपारी साडेतीन वाजल्यापासून प्रेक्षकांसाठी उघडली जाणार आहेत, तर सामना सायंकाळी सात वाजता सुरू होईल. मोठी गर्दी अपेक्षित असल्यामुळे प्रेक्षकांनी किमान दोन ते तीन तास आधी स्टेडियमवर पोहोचण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे. स्टेडियममध्ये बॅग, पावर बँक, पाण्याच्या बाटल्या आणि छत्री यांसारख्या वस्तूंवर बंदी असेल. प्रेक्षकांना केवळ मोबाईल फोन आणि पाकीट आत नेण्याची परवानगी दिली जाणार आहे.
अहमदाबादच्या मोटेरा परिसरात असलेले नरेंद्र मोदी स्टेडियम हे जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट मैदानांपैकी एक मानले जाते. येथे सुमारे एक लाख तीस हजार प्रेक्षक बसू शकतात. मात्र मोठ्या गर्दीमुळे मोबाईल नेटवर्कवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने प्रेक्षकांनी आपले डिजिटल तिकीट आधीच मोबाईलमध्ये डाउनलोड करून ऑफलाइन स्वरूपात जतन करून ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule