मेघालयमध्ये 51 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त
शिलाँग,07 मार्च (हिं.स.) : मेघालय पोलिसांनी ईस्ट जैंतिया हिल्स जिल्ह्यात 51 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. ही कारवाई राज्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी नार्कोटिक्स जप्ती मानली जात आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली
मेघालयमध्ये हेरॉईन तस्करांसह पोलिस अधिकारी


शिलाँग,07 मार्च (हिं.स.) : मेघालय पोलिसांनी ईस्ट जैंतिया हिल्स जिल्ह्यात 51 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. ही कारवाई राज्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी नार्कोटिक्स जप्ती मानली जात आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली.

याबाबत पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही कारवाई शुक्रवारी रात्री राताचेरा परिसरात पोलीस आणि अँटी-नार्कोटिक्स टास्क फोर्स (एएनटीएफ) यांच्या संयुक्त नाका तपासणीदरम्यान करण्यात आली. या कारवाईदरम्यान चालकासह तीन जण असलेली एक कार थांबवून तिची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान तिघांपैकी एका व्यक्तीकडून प्लास्टिकच्या साबणाच्या 19 डब्या आढळल्या. त्यामध्ये एकूण 203.7 ग्रॅम वजनाची संशयित हेरॉईन आढळून आले. यानंतर वाहनाची सखोल तपासणी करण्यात आली असता, गाडीत बसलेल्या दुसऱ्या व्यक्तीच्या निळ्या रंगाच्या ट्रॉली बॅगमध्ये 10.145 किलोग्राम वजनाच्या क्रिस्टल मेथ (मेथॅमफेटामाइन) गोळ्या सापडल्या. भारतात ‘मेथ’ गोळ्यांवर बंदी आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, गाडीत असलेल्या तिघांपैकी दोघांना अटक करण्यात आली आहे.

प्राथमिक तपासातून असे समोर आले आहे की हे आरोपी आंतरराज्यीय आणि सीमापार ड्रग तस्करी करणाऱ्या सिंडिकेटचा भाग आहेत. एएनटीएफ प्रमुख विकास कुमार यांनी सांगितले की जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांची एकूण किंमत सुमारे 51.13 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.

---------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande