इराणी जहाजांना कोची बंदरात परवानगीचा निर्णय मानवतावादी : एस. जयशंकर
नवी दिल्ली, 7 मार्च (हिं.स.) : भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी रायसीना डायलॉग 2026 दरम्यान मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणी नौदलाच्या जहाजांना कोची बंदरात डॉक करण्यास दिलेल्या परवानगीचे समर्थन केले. त्यांनी स्पष्ट केले
विदेश मंत्री एस. जयशंकर


नवी दिल्ली, 7 मार्च (हिं.स.) : भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी रायसीना डायलॉग 2026 दरम्यान मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणी नौदलाच्या जहाजांना कोची बंदरात डॉक करण्यास दिलेल्या परवानगीचे समर्थन केले. त्यांनी स्पष्ट केले की हा निर्णय कोणत्याही कायदेशीर गुंतागुंतींपेक्षा वर जाऊन पूर्णपणे मानवतावादी दृष्टिकोनातून घेण्यात आला.

जयशंकर म्हणाले की, भारताला इराणकडून संदेश मिळाला होता की एक जहाज भारतीय सीमेजवळ असल्याने ते भारताच्या बंदरात येऊ इच्छित आहे. त्या जहाजावरील कर्मचाऱ्यांना काही अडचणी येत असल्याची माहिती देण्यात आली होती. यानंतर भारताने 1 मार्च रोजी त्या जहाजाला कोची बंदरात येण्याची परवानगी दिली. मात्र जहाज काही दिवसांनीच तेथे पोहोचले. जहाजावर अनेक तरुण कॅडेट होते. जहाज जेव्हा निघाले तेव्हा परिस्थिती वेगळी होती; परंतु कोची येथे पोहोचेपर्यंत परिस्थितीत मोठा बदल झाला होता.

जयशंकर यांच्या या टिप्पणी IRIS Dena, IRIS Lavan आणि IRIS Bushehr या तीन इराणी नौदल जहाजांच्या संदर्भात होत्या. ही जहाजे मार्चच्या पहिल्या आठवड्यात इराण, अमेरिका आणि इस्त्रायल यांच्यात वाढत्या तणावाच्या केंद्रस्थानी आली होती. फेब्रुवारी महिन्यात विशाखापट्टणम येथे भारतीय नौदलाने आयोजित केलेल्या International Fleet Review 2026 आणि MILAN 2026 या आंतरराष्ट्रीय नौदल सरावांमध्येही या जहाजांनी सहभाग घेतला होता.दरम्यान, 4 मार्च रोजी श्रीलंकेच्या दक्षिण किनाऱ्याजवळील आंतरराष्ट्रीय पाण्यात गंभीर घटना घडली. गालेजवळ अमेरिकन पाणबुडीने डागलेल्या टॉरपीडोने इराणी फ्रिगेट IRIS Dena ला लक्ष्य केले, ज्यामुळे जहाज बुडाले. या दुर्घटनेनंतर श्रीलंकन अधिकाऱ्यांनी 87 मृतदेह बाहेर काढले, तर 32 नौसैनिकांना जिवंत वाचवून उपचारासाठी गाले येथे नेण्यात आले.

जयशंकर यांनी याबाबत सांगितले की भारताने या परिस्थितीकडे कायदेशीर मुद्द्यांपलीकडे जाऊन मानवतेच्या दृष्टीकोनातून पाहिले. “आम्ही पूर्णपणे मानवतावादी विचार करून निर्णय घेतला आणि मला वाटते आम्ही योग्य निर्णय घेतला,” असे जयशंकर यांनी स्पष्ट केले.--------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande