भारताने शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अण्णा हजारेंचे पंतप्रधानांना पत्र
मुंबई, 07 मार्च (हिं.स.)। जगाचे लक्ष सध्या अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीकडे लागले आहे. या संघर्षामुळे जागतिक पातळीवर अस्वस्थता वाढली असून हजारो निरपराध नागरिकांचे प्राण गेले आहेत. युद्धामुळे सामान्य नागरिक,
Anna Hazare


मुंबई, 07 मार्च (हिं.स.)। जगाचे लक्ष सध्या अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीकडे लागले आहे. या संघर्षामुळे जागतिक पातळीवर अस्वस्थता वाढली असून हजारो निरपराध नागरिकांचे प्राण गेले आहेत. युद्धामुळे सामान्य नागरिक, महिला आणि मुलांवर गंभीर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त करत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून भारताने जागतिक शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अशी विनंती केली आहे.

जगभरातील वेगवेगळ्या भागांमध्ये वाढत चाललेल्या संघर्ष आणि तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतासारख्या मोठ्या लोकशाही राष्ट्राने शांततेचा संदेश द्यावा, असे अण्णा हजारे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. सध्या युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत सर्वाधिक फटका सामान्य नागरिकांना बसत असून अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. निरपराध महिला, मुले आणि कुटुंबांवर होत असलेल्या परिणामांच्या बातम्या अत्यंत वेदनादायी आणि दु:खद असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

भारताची संस्कृती ही अहिंसा, शांतता आणि संवादाची राहिली आहे. इतिहासात भारताने नेहमीच जगाला शांततेचा आणि संवादाचा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आजच्या तणावपूर्ण परिस्थितीत भारताने तटस्थ आणि जबाबदार भूमिका घेत जागतिक पातळीवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा अण्णा हजारे यांनी व्यक्त केली आहे.

आजच्या जगाला शस्त्रांची नव्हे तर विश्वास, सहकार्य आणि संवादाची गरज आहे. युद्धामुळे केवळ विनाश आणि अस्थिरता निर्माण होते, तर संवाद आणि परस्पर समजुतीतून स्थैर्याचा मार्ग निर्माण होऊ शकतो, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने अनेक आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळे या संवेदनशील काळात भारताने मानवतेच्या आणि शांततेच्या बाजूने उभे राहून संवाद आणि सहकार्याचा मार्ग मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा अण्णा हजारे यांनी आपल्या पत्रातून व्यक्त केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande