
छत्रपती संभाजीनगर, 01 एप्रिल (हिं.स.)।
जालन्यात समृद्धी महामार्गावर बुधवारी झालेल्या भीषण अपघातामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी आहेत. प्राथमिक माहितीनुसार, समृद्धी महामार्गावरील कडवंची गावाजवळ हा अपघात झाला. कडवंची गावाकडून जालना शहराकडे येणाऱ्या मजुरांच्या पिक अपला मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत आठ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये सहा महिलांचा समावेश आहे. या महिला समृद्धी महामार्गावर सफाईचे काम करत होत्या. काम आटोपून या महिला पिकअप व्हॅनमध्ये बसल्या होत्या. त्यावेळी मुंबईच्या दिशेने निघालेल्या भरधाव ट्रकने पिकअप व्हॅनला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, आठ महिलांनी जागेवरच प्राण सोडला. हा अपघात झाल्यानंतर मदतीसाठी पोलीस घटनास्थळी उशीरा पोहोचले, असा आरोप होत आहे. यामुळे स्थानिक नागरिक संतापले होते. या अपघाताचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. दोन जण गंभीर जखमी असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. मात्र, यानिमित्ताने समृद्धी महामार्गावरील अपघातांचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
या अपघातानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन मदतीची घोषणा केली आहे. जालनानजीक समृद्धी महामार्गावर झालेल्या एका अपघातात 8 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या घटनेत जे लोक जखमी झाले त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि स्थानिक प्रशासन समन्वय साधून आहेत. जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक स्वतः तेथे आहेत. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. या अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis