
गडचिरोली., 01 एप्रिल (हिं.स.)
नक्षल निर्मुलनाच्या डेडलाईनच्या दिवशी मंगळवारी (दि. ३१) छत्तीसगडमधील ९ नक्षली गडचिरोलीत आत्मसमर्पण करीत असताना तिकडे डाव्या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात एकमेव शिल्लक असलेल्या जयराम गावडे नावाच्या नक्षल्याच्या कुटुंबीयांची त्यांच्या गावी भेट घेऊन आत्मसमर्पण करण्याचे आवाहन केले.
देशभरातील नक्षल चळवळीचं निर्मुलन करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ३१ मार्च ही अंतिम तारीख जाहीर केली होती. त्याअनुषंगाने मंगळवारी छत्तीसगडमधील ९ नक्षल्यांनी गडचिरोलीत पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्यापुढे आत्मसमर्पण केले.
गडचिरोली जिल्ह्यात आता केवळ सहा सशस्त्र नक्षलवादी शिल्लक असून, जयराम गावडे हा एकमेव नक्षली गडचिरोली जिल्ह्याचा रहिवासी आहे, तर अन्य पाच जण छत्तीसगडमधील आहेत, असे नीलोत्पल यांनी सांगितले.
याच दिवशी शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. अमोल मारकवार, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार, सूरज जक्कुलवार हे एटापल्ली तालुक्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी रेकॉर्डवरील शेवटचा नक्षलवादी जयराम उर्फ नंदू मोंगे गावडे याच्या गिलनगुडा येथील घरी भेट देऊन त्याचे वडील मोंगे गावडे यांच्याशी चर्चा केली. जयरामने बंदुकीचा त्याग करून लोकशाहीचा मार्ग स्वीकारावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
शंभर वर्षांपूर्वी स्थापन झालेला भारतीय कम्युनिस्ट पक्ष, ऐंशी वर्षांपूर्वी स्थापन झालेला शेतकरी कामगार पक्ष आणि साठ वर्षांपूर्वी स्थापन झालेला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आजही देशातील सामान्य जनतेसाठी संसद, विधिमंडळ आणि रस्त्यावर सातत्याने लढत असून या पक्षांनी कोट्यवधी लोकांना त्यांचे घटनात्मक अधिकार मिळवून दिले आहेत. रोजगार हमी, पेसा, वनाधिकारासारखे जनहिताचे कायदे डाव्या पक्षांनी लोकशाही मार्गाने केलेल्या संघर्षाचे फलित आहे.
भारतात बंदुकीच्या जोरावर जनतेचे भले होण्याची कल्पना कपोलकल्पित ठरली आहे. भारत हा लोकशाहीवादी देश असून संविधानिक पध्दतीने चालत आलेला आहे. त्यामुळे उरलेल्या नक्षलवाद्यांनी बंदुकीचा त्याग करून लोकशाही प्रक्रियेत येऊन डाव्या पक्षांच्या नेतृत्वाखाली संघर्ष करावा, सर्व आत्मसमर्पितांचे आम्ही आमच्या पक्षात स्वागत करु, असे आवाहन भाई रामदास जराते, कॉ. अमोल मारकवार, कॉ. सचिन मोतकुरवार, कॉ. सूरज जक्कुलवार यांनी केले आहे.
जयरामने परत यावेः वडील मोंगे गावडे यांचे भावनिक आवाहन
घरकामाबद्दल रागावल्याच्या कारणावरून नंदू घर सोडून गेला आणि नक्षल दलममध्ये भरती झाला. तेव्हापासून तो घरी आलाच नाही. आता नक्षलवाद्यांचे सर्व मोठे नेते दलम सोडून गेले. अशा स्थितीत जंगलात राहण्यापेक्षा चळवळ सोडून नंदूने घरी परत यावे, असे भावनिक आवाहन वडील मोंगे गावडे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Milind Khond