परभणीत पोलीस जवानांसाठी विशेष चित्रपट प्रदर्शनाचे आयोजन
परभणी, 01 एप्रिल, (हिं.स.)। वर्षभर कर्तव्य बजावताना सतत तणावाखाली काम करणाऱ्या पोलीस अंमलदारांना बुधवारी एक सुखद आणि अनपेक्षित अनुभव मिळाला. अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ यांच्या पुढाकारातून पोलीस जवानांसाठी विशेष चित्रपट प्रदर्शनाचे आयोजन करण्या
पोलीस अंमलदारांना सुखद धक्का; विशेष चित्रपट प्रदर्शनाने विरंगुळा


परभणी, 01 एप्रिल, (हिं.स.)। वर्षभर कर्तव्य बजावताना सतत तणावाखाली काम करणाऱ्या पोलीस अंमलदारांना बुधवारी एक सुखद आणि अनपेक्षित अनुभव मिळाला. अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ यांच्या पुढाकारातून पोलीस जवानांसाठी विशेष चित्रपट प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.

सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास अप्पर पोलीस अधीक्षक गुंजाळ यांनी राखीव पोलीस निरीक्षक साळुंखे यांना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न असल्याचे सांगत सर्व जवानांना तातडीने कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत, गंगाखेड रोडवरील अनुसया थिएटर परिसरात पाठवण्याचे आदेश दिले. त्यानुसार सर्व पोलीस जवान तेथे दाखल झाले. मात्र, घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. कारण तेथे स्वतः अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. यानंतर सर्व अंमलदारांना थिएटरमध्ये बसवून त्यांच्यासाठी ‘धुरंदर’ या चित्रपटाचा विशेष शो आयोजित करण्यात आला. अचानक मिळालेल्या या विरंगुळ्यामुळे जवानांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून असा उपक्रम प्रथमच अनुभवायला मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. या उपक्रमासाठी अनुसया थिएटरचे जामकर यांनी विशेष शो उपलब्ध करून दिला. तर कोतवाली पोलीस ठाण्याचे ठाणेदार विश्वजीत कासले यांनी नियोजन व समन्वयाची जबाबदारी सांभाळली. पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या हस्ते चित्रपट प्रदर्शनाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ म्हणाले की, “वर्षभर पोलीस जवानांनी निवडणुका, सण-उत्सव आदी काळात अतिशय मेहनतीने काम केले आहे. त्यांच्या ताणतणावात थोडा विरंगुळा मिळावा, या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला.”या अनोख्या उपक्रमामुळे पोलीस अंमलदारांच्या दैनंदिन तणावातून क्षणभर मुक्तता मिळाली असून त्यांच्या आनंदात भर पडली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande