
सोलापूर, 11 एप्रिल (हिं.स.)।
शहरातील गुंठेवारी प्रकरणे निकाली काढण्यास विलंब होत असल्याने आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी बांधकाम व नगररचना विभागातील अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले. सहा महिन्यांपूर्वी आयोजित शिबिरांमध्ये सुमारे ७०० ते ८०० प्रकरणांची नोंद झाली होती; मात्र आतापर्यंत केवळ १४९ बांधकाम परवाने देण्यात आले आहेत. उर्वरित प्रकरणे का प्रलंबित आहेत, याचा खुलासा करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.
महापालिकेच्या सभागृहात महापौर विनायक कोंड्याल व आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या अध्यक्षतेखाली हद्दवाढ भागातील गुंठेवारी विकास, मोजणी प्रक्रिया, नोटरी व्यवहार तसेच टी.पी. ४ योजनेअंतर्गत प्रॉपर्टी कार्ड तयार करण्याबाबत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत नोटरी व्यवहारांमधील मुद्रांक शुल्क टाळले गेले असल्यास संबंधित मिळकतदारांनी त्या वेळच्या रेडीरेकनर दरानुसार शासकीय नियमांनुसार नोंदणीकृत व्यवहार पूर्ण करावेत, अशी माहिती मुद्रांक उपजिल्हाधिकारी श्रीराम कोळी यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड