डॉ. भीमराव हत्तीअंबीरे यांना ‘भीम रत्न पुरस्कार’ जाहीर; महू येथे 14 एप्रिल रोजी होणार सन्मान
परभणी, 11 एप्रिल (हिं.स.)। समाजसेवा, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक न्याय या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणारे समाजभूषण डॉ. भीमराव हत्तीअंबीरे यांना प्रतिष्ठेचा ‘भीम रत्न पुरस्कार’ जाहीर झाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायट
डॉ. भीमराव हत्तीअंबीरे यांना ‘भीम रत्न पुरस्कार’ जाहीर; महू येथे 14 एप्रिल रोजी होणार सन्मान


परभणी, 11 एप्रिल (हिं.स.)।

समाजसेवा, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक न्याय या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणारे समाजभूषण डॉ. भीमराव हत्तीअंबीरे यांना प्रतिष्ठेचा ‘भीम रत्न पुरस्कार’ जाहीर झाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी यांच्या वतीने 14 एप्रिल रोजी महू येथे आयोजित भीम जयंती महोत्सवात डॉ. मोहन यादव यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. डॉ. हत्तीअंबीरे यांचे कार्य बहुआयामी असून गेल्या 25 वर्षांपासून त्यांनी परभणी येथे, 5 वर्षांपासून हिंगोलीत आणि 4 वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर येथे सामूहिक विवाह सोहळ्यांचे यशस्वी आयोजन केले आहे. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत 3000 हून अधिक जोडप्यांचे विवाह पार पडले असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोठा दिलासा मिळाला आहे. युवकांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी छत्रपती संभाजीनगर, पुणे, नागपूर, परभणी व हिंगोली येथे स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्रे सुरू केली आहेत. या माध्यमातून हजारो युवक-युवतींना शासकीय सेवेत संधी मिळाली आहे. शिक्षण क्षेत्रात परभणी येथे शाळा तसेच वाळूज (छत्रपती संभाजीनगर) येथे कनिष्ठ महाविद्यालय सुरू करून शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. मुलींसाठी वसतिगृहे चालवून त्यांनी शिक्षणाला बळ दिले आहे.सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात मागासवर्गीयांवरील अन्याय-अत्याचाराच्या घटनांमध्ये तत्काळ मदत व न्याय मिळवून देण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले आहे. पर्यावरण संवर्धनासाठी छत्रपती संभाजीनगर येथे उजाड माळरानावर ‘संबोधी वन’ उभारून वृक्षलागवड तसेच पाणीसाठ्यासाठी बंधारे उभारण्याचे कार्य केले आहे. आरोग्य क्षेत्रात विविध रोगनिदान शिबिरे व गेल्या 25 वर्षांपासून रक्तदान शिबिरांचे आयोजन करून अनेकांना जीवनदान दिले आहे. डॉ. हत्तीअंबीरे यांच्या सर्वसमावेशक कार्याची दखल घेत जाहीर करण्यात आलेला ‘भीम रत्न पुरस्कार’ हा त्यांच्या समाजसेवेचा सन्मान असून मराठवाड्यासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते व संबोधी अकादमी परिवाराच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande