
मुंबई, 14 एप्रिल, (हिं.स.)। साक्षात स्वामी समर्थ ही नवी मालिका आता स्वामी भक्तांच्या, प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकताच भव्य शुभारंभाने या मालिकेच्या चित्रीकरणालाही सुरुवात झाली. याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर, कलाकार आदी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. स्वामी समर्थ यांच्या बद्दलचे साक्षात्कार, अनुभव अशा सत्य प्रसंगांवर आधारित मालिकेचा प्रत्येक भाग अतिशय उत्कंठा वाढवणारा असणार आहे. या मालिकेचे वैशिष्ट म्हणजे सत्य प्रसंगाची अनुभूती येण्यासाठी मूळ ठिकाणी म्हणजेच एक्चुअल लोकेशनवर भर देऊन चित्रिकरण करण्यात येणार आहे. या मालिकेत स्वामींच्या मुख्य भूमिकेत सुप्रसिध्द अभिनेते सुनिल जगताप दिसणार असून त्यांच्या प्रभावी व्यक्तीमत्वाने शुभारंभाप्रसंगी अनेक जण भारावून गेले.
श्री स्वामी समर्थांच्या साक्षात्कारांनी अनेकांच्या जीवनात अमुलाग्र सकारात्मक बदल झाले आहेत, स्वामींचे अनुभव भारवणारे आहेत, त्यातून मिळणारी ऊर्जा जीवन बदलून टाकणारी आहे. नेमके हेच पैलू या मालिकेतून प्रेक्षकांच्या समोर येणार आहेत. कुमार स्वप्नील एंटरटेनमेंट द्वारे या मालिकेची निर्मीती - प्रस्तुतीकरण करण्यात आले असून मालिकेचे लेखक, निर्माता, दिग्दर्शक कुमार स्वप्नील आहेत. छायाचित्रकार रमेश शेळके, तर कथा, पटकथा, संवाद, लेखन डॉ. दीपक दळवी, कुमार स्वप्नील, प्रज्ञा पळसुळे यांनी केले आहे. गीतकार-संगीतकार आर. विशाल आहेत, शिर्षकगीत विद्याधर गोरे यांनी गायले आहे. रंगभूषाकार नितीन दांडेकर, तर अरेंजर राहुल आहेत. तर या मालिकेतील कलाकार नितीन शहाणे, दिपक दळवी, गिरीष तींदोलीया, अरुण खरात, स्मिता मोरे, शुभांगी भोर, नंदकुमार सावर्डेकर आणि स्वामींच्या मुख्य भूमिकेत सुनिल जगताप आहेत. सुनिल जगताप यांनी आजवर अनेक नाटक, मालिका, चित्रपट यामधून विविधारंगी भूमिका साकारल्या आहेत. सदर मालिकेचे चित्रीकरण, खारेगांव, मुंब्रा, रेतीबंदर, श्री निलेश पाटील यांचे कार्यालय तसेच श्री. नविन कोळी, लोकेश कोळी यांच्या फ्लॅटवर करण्यात आले.
साक्षात स्वामी समर्थ. ... मालिका म्हणजे केवळ मनोरंजन नसून श्रध्दा आणि भावनांचा अनोखा मेळ असणार आहे. उठावदार प्रसंग, भक्तिमय वातावरण, समरसतेने सादरीकरण आदी गोष्टींमुळे मालिकेच्या शुभारंभापासूनच साक्षात्काराची अनुभूती येत असल्याची भावना सर्वजण व्यक्त करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर