
अमरावती, 15 एप्रिल (हिं.स.) : शेती खरेदीच्या व्यवहारात शहरातील एका ५३ वर्षीय महिलेची तब्बल ५८ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शहर कोतवाली पोलिसांनी पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार महिला मालमत्ता खरेदी-विक्रीचा व्यवसाय करत असून, त्यांच्या पतीचे ७ सप्टेंबर २०२१ रोजी निधन झाले होते. त्यांच्या पतीने संशयित रवींद्र बबनराव चव्हाण (वय ४६) यांच्यासह अन्य चार जणांशी रेवसा ग्रामपंचायत हद्दीतील १ हेक्टर १९ आर (सुमारे २ एकर ३९ गुंठे) शेतजमिनीबाबत इसारचिठ्ठी केली होती. या व्यवहारात प्रतिएकर ५८ लाख रुपयांप्रमाणे एकूण सुमारे २ कोटी ३० लाख ५६ हजार २५० रुपयांचा व्यवहार ठरला होता.
यापैकी ८३ आर जमीन तक्रारदार महिलेच्या मालकीची होती. संबंधित जमीन खरेदीसाठी इच्छुक असतानाही संशयितांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी व्यवहारात फसवणूक केल्याचा आरोप महिलेने केला आहे.
या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी महिला अमरावतीच्या दुय्यम निबंधक कार्यालयात गेल्यानंतर, संबंधित जमीन संशयितांनी दुसऱ्या व्यक्तीला विकल्याचे समोर आले. इसारापोटी घेतलेले ५८ लाख रुपये परत न करता फसवणूक केल्याचा आरोप महिलेने आपल्या तक्रारीत केला आहे.
या प्रकरणी शहर कोतवाली पोलिसांनी पाचही संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदविला असून, मंगळवार (१४ एप्रिल) पर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नव्हती. पुढील तपास सुरू आहे.
------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी