अभिषेक,ओम कडलग यांनाही अटक
Abhishek, Om Kadlag also arrested
अभिषेक,ओम कडलग यांनाही अटक


श्री त्र्यंबकेश्वर व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली आर्थिक लूट

नाशिक, 15 एप्रिल (हिं.स.)। जगातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर देवस्थानमध्ये व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली भाविकांची मोठी आर्थिक लूट होत असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांनी या रॅकेटचा मुख्य सूत्रधार आणि त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचा विश्वस्त पुरुषोत्तम मधुकर कडलग यांच्यानंतर अभिषेक आणि ओम कडलग यांनाही अटक केली असून, या कारवाईमुळे संपूर्ण जिल्हा हादरला आहे.

कडलग हा महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा कार्याध्यक्षदेखील असल्याने या प्रकरणाला राजकीय वळणही मिळाले आहे.

चार महिन्यांत साडेतीन कोटींचा आकडा समोर येत असून रिमांड रिपोर्टमध्ये नमूद केल्यानुसार, दर्शनासाठी केवळ अर्ध्या तासात ४ भाविकांकडून ९ हजार रुपये उकळले गेल्याचे निष्पन्न झाले आहे. याच गणितानुसार या घोटाळ्याची (Scam) व्याप्ती पाहिली तर ती चक्रावून टाकणारी आहे. पहाटे चार ते रात्री नऊ असे अठरा तास मंदिर खुले असते..वरील हिशेबानुसार एक तासांत आठ भाविकांचे सरासरी १८ हजार रुपये होतात. यात १८ तासांच्या गणितानुसार दररोज १४४ भाविकांचे ३ लाख २४ हजार रुपये होतात. म्हणजे एका

महिन्याची अंदाजित लूट ९७ लाख २० हजार रुपये इतकी आढळते. म्हणजेच, मागील ४ महिन्यांचा अंदाजित घोटाळा तीन कोटी ८८ लाख ८० हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे. या रॅकेटमध्ये आणखी किती बडे मासे गळाला लागतात आणि जमा झालेली कोट्यवधींची रक्कम कुणाकुणाच्या खिशात गेली, याचा शोध सुरु आहे. या प्रकरणामुळे त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या प्रतिमेला तडा गेला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande