
बीड, 15 एप्रिल, (हिं.स.)। अंबाजोगाई तालुक्यातील हाडबेवाडी येथे मजुरी करून आयुष्यभर साठवलेली पुंजी आणि कष्टाचे सोने अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून लंपास केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. एकदाम्पत्य आपल्या मुलीकडे गेले असताना, संधी साधून चोरट्यांनी ११ ते १३ एप्रिल २०२६ दरम्यान त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी धान्याच्या कोठीत व गादीखाली अत्यंत सुरक्षितपणे लपवून ठेवलेले ३ लाख ८० हजार रुपये आणि ४२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने असा एकूण ४ लाख २२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
आयुष्यभराची कमाई एका क्षणात गमावल्याने मजूर कुटुंब पूर्णपणे कोलमडले असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. बर्दापूर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक रमेश घुले आरोपींचा तपास करत आहेत. सामान्य कष्टकऱ्याच्या घामाच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या गुन्हेगारांना तातडीने जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis