जळगावात भोंदूबाबा व त्याच्या पत्नीकडून महिलेची 11 लाखांची फसवणूक
जळगाव, 15 एप्रिल (हिं.स.) जळगावतही एका भोंदू बाबाचा कारनामा हा उघड झाला आहे. भोंदू बाबा व त्याच्या पत्नीने एका महिलेची 11 लाखात फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अघोरी विद्या, करणी बाधा व गुप्त धन मिळवून देण्याच्या आमिषाने एका महिला ग्
जळगावात भोंदूबाबा व त्याच्या पत्नीकडून महिलेची 11 लाखांची फसवणूक


जळगाव, 15 एप्रिल (हिं.स.) जळगावतही एका भोंदू बाबाचा कारनामा हा उघड झाला आहे. भोंदू बाबा व त्याच्या पत्नीने एका महिलेची 11 लाखात फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अघोरी विद्या, करणी बाधा व गुप्त धन मिळवून देण्याच्या आमिषाने एका महिला ग्राफिक डिझायनरची तब्बल ११ ते १२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार जळगावात समोर आला आहे. या प्रकरणी भोंदू बाबा ललित पाटील व त्याची महिला पोलीस कर्मचारी असलेली पत्नी महिमा उर्फ मनोरमा पाटील यांच्याविरुद्ध २०२२ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, चार वर्षांचा कालावधी उलटूनही आरोपी भोंदूबाबा आणि त्याची महिला पोलीस कर्मचारी पत्नी अद्याप फरार आहेत. पीडित ग्राफिक डिझायनर महिला व आरोपी महिमा पाटील या कॉलेजपासून एकमेकींच्या ओळखीच्या होत्या. घरगुती वादाच्या पार्श्वभूमीवर पीडित महिलेने मैत्रिणीशी संपर्क साधला असता, महिमाने आपल्या पतीकडे अलौकिक शक्ती असल्याचे सांगून त्यांच्याकडे उपाय असल्याचे पटवून दिले. आणि विश्वासात घेतलं, त्यानंतर भोंदू बाबा ललित पाटील याने ‘अंगात पीर बाबा येतात’ असा बनाव करत अघोरी विधी सुरू केले. तुम्हाला तुझ्या दिराच्या आत्म्याचा त्रास, घरावर करणी झाल्याची भीती दाखवत आरोपींनी पीडित महिलेला मानसिकदृष्ट्या घाबरवले. सुरुवातीला घरगुती पूजा करून लहान रक्कम घेतल्यानंतर ‘गुप्त धन’ मिळवून देण्याचे आमिष दाखवत वेळोवेळी लाखो रुपये उकळले. ही रक्कम रोख तसेच ऑनलाईन व्यवहारांद्वारे घेतली गेल्याचे समोर आले आहे. फसवणुकीचा भाग म्हणून आरोपींनी पीडित महिलेला व तिच्या कुटुंबाला देशभर विविध ठिकाणी नेले. उज्जैन येथील स्मशानभूमीत अघोरी पूजा करण्यात आली. तसेच गोगामेडी, पुष्कर, अजमेर, ओंकारेश्वर आणि भारत-पाक सीमेवरील तनोट माता मंदिर येथे विशेष पूजांच्या नावाखाली मोठी रक्कम उकळण्यात आली. जळगावात परतल्यानंतरही आरोपी दांपत्याने पीडित महिलेच्या घरी मुक्काम करून ‘बाधा काढण्याच्या’ नावाखाली पुन्हा पुन्हा पैशांची मागणी केली. कर्ज काढून पैसे दिल्यानंतरही कोणताही फरक न पडल्याने महिलेने पैसे परत मागितले असता, “पैसे मागितल्यास सात पिढ्यांचा नाश करेन” अशी धमकी आरोपीने दिल्याचा आरोप पीडित ग्राफिक डिझायनर महिलेने केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर रामानंद नगर पोलिसांनी आरोपी महिमा पाटील भांडुप येथे कार्यरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर तेथे शोध घेतला होता. मात्र, ती तेथेही आढळून आली नाही. पोलिसांकडून सातत्याने शोध सुरू असूनही अद्याप आरोपींचा ठावठिकाणा लागलेला नाही. याबाबत पीडित महिलेने जळगाव पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन आरोपींना तातडीने अटक करून आपली फसवणूक झालेली रक्कम परत मिळवून देण्याची मागणी केली आहे. तसेच आरोपी महिला पोलीस कर्मचारी असल्याने तपासात दिरंगाई होत असल्याचा आरोपही तिने केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande