
धुळे, 15 एप्रिल (हिं.स.) : कत्तलीच्या उद्देशाने जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या तीन मिनी ट्रकवर धुळे तालुका पोलिसांनी कारवाई करत त्यांना जप्त केले. ही कारवाई धुळे–चाळीसगाव मार्गावरील चांदे (ता. धुळे) शिवारात शनिवारी करण्यात आली.
पोलिसांकडून महामार्गावर वाहनांची तपासणी सुरू असताना जनावरांची निर्दयतेने व बेकायदेशीर वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर एकापाठोपाठ तीन मिनी ट्रक अडवून तपासणी करण्यात आली असता, विना परवाना जनावरांची वाहतूक होत असल्याचे स्पष्ट झाले. प्राथमिक अंदाजानुसार ही जनावरे कत्तलीच्या उद्देशाने अन्य जिल्ह्यात नेली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, तीनही वाहनचालकांविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू आहे.
पहिल्या प्रकरणात संशयित फिरोज आयुब खान (वय ५२, रा. पश्चिम हुडको, चाळीसगाव रोड, धुळे) याच्याविरुद्ध हवालदार संदीप गुरव यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्या ताब्यातील मिनी ट्रक (एम.एच. ०३ सीपी ०२६७) व सुमारे २० हजार रुपये किमतीचे दोन गोवंश जप्त करण्यात आले.
दुसऱ्या प्रकरणात शिवप्रसाद भिला पाटील (वय ५२, रा. कापडणे, ता. धुळे) याच्याकडून मिनी ट्रक (एम.एच. ०१ बीआर ०२७६) आणि दोन गोवंश जप्त करण्यात आले. तिसऱ्या प्रकरणात हवालदार दीपक मोहिते यांच्या फिर्यादीनुसार मनोहर श्रीराम पाटील (वय ४०, रा. भडणे, ता. शिंदखेडा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्याकडूनही वाहन व दोन गोवंश जप्त करण्यात आले आहेत.पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, या प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे.
---------------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर