गौतम अदानी बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
- मुकेश अंबानींना मागे टाकत ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्समध्ये १९व्या स्थानावर नवी दिल्ली, 17 एप्रिल (हिं.स.)। गौतम अदानी यांनी पुन्हा एकदा संपत्तीच्या शर्यतीत आघाडी घेत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान मिळवला आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर इं
Gautam Adani overtakes Mukesh Ambani become Asia richest person


- मुकेश अंबानींना मागे टाकत ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्समध्ये १९व्या स्थानावर

नवी दिल्ली, 17 एप्रिल (हिं.स.)। गौतम अदानी यांनी पुन्हा एकदा संपत्तीच्या शर्यतीत आघाडी घेत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान मिळवला आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्स नुसार अदानी यांची एकूण नेटवर्थ ९२.६ अब्ज डॉलर (सुमारे ८.५९ लाख कोटी रुपये) इतकी झाली आहे. यामुळे त्यांनी मुकेश अंबानी यांना मागे टाकत अव्वल स्थान पटकावले आहे. अंबानी यांची संपत्ती सध्या ९०.८ अब्ज डॉलर (सुमारे ८.४२ लाख कोटी रुपये) इतकी नोंदवली गेली असून ते आशियात दुसऱ्या क्रमांकावर गेले आहेत.

जागतिक पातळीवर पाहता अदानी १९व्या क्रमांकावर पोहोचले असून अंबानी २०व्या स्थानावर आहेत. या यादीत एलन मस्क ६५६ अब्ज डॉलर संपत्तीसह पहिल्या क्रमांकावर कायम आहेत. त्यांच्या पाठोपाठ लॅरी पेज आणि जेफ बेझोस यांचा क्रम लागतो.

२०२६ च्या सुरुवातीपासून अदानी आणि अंबानी यांच्या संपत्तीत वेगवेगळा कल दिसून आला आहे. अदानी यांच्या संपत्तीत यावर्षी ८.१ अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे ७५ हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे. यामागे अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये झालेली वाढ हा मुख्य घटक ठरला आहे. दुसरीकडे अंबानी यांच्या संपत्तीत १६.९ अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे १.५७ लाख कोटी रुपयांची घट झाली असून रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समधील चढ-उतार यासाठी कारणीभूत ठरले आहेत.

विशेष म्हणजे, शेअर बाजारात अस्थिरता असतानाही अदानी यांच्या संपत्तीत एका दिवसात तब्बल ३.५६ अब्ज डॉलर म्हणजेच ३३ हजार कोटी रुपयांची वाढ झाली. या झपाट्याने झालेल्या वाढीमुळे त्यांनी अंबानींना मागे टाकण्यात यश मिळवले. अंबानी यांच्या संपत्तीतही त्याच दिवशी ७.६७ अब्ज डॉलरची वाढ झाली, मात्र अदानी यांच्या वेगाशी तुलना करता ती कमी पडली. आशियातील श्रीमंतांच्या यादीत अदानी आणि अंबानी यांच्या पाठोपाठ चीनमधील झोंग शानशान, कॉलिन हुआंग आणि मा हुआतेंग यांचा समावेश आहे. या स्पर्धेत भारतीय उद्योगपतींची मजबूत उपस्थिती देशाच्या अर्थव्यवस्थेची ताकद दर्शवते.

अदानी समूहाने पायाभूत सुविधा, ऊर्जा आणि बंदर क्षेत्रात केलेला वेगवान विस्तार त्यांच्या संपत्तीत वाढ होण्यामागील प्रमुख कारण मानला जातो. दुसरीकडे रिलायन्स समूहही विविध क्षेत्रात विस्तार करत असला तरी शेअर बाजारातील चढ-उतारांचा परिणाम अंबानी यांच्या नेटवर्थवर दिसून आला आहे. अदानी आणि अंबानी यांच्यातील ही क्रमांक एकची स्पर्धा आगामी काळातही कायम राहण्याची शक्यता असून बाजारातील परिस्थितीनुसार त्यात सतत बदल होत राहतील.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande