बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला गुजरातमध्ये अटक
पाटणा, 17 एप्रिल (हिं.स.)। मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपी शेखर यादवला गुजरातमधून अटक करण्यात आली आहे. शपथविधीच्या दिवशी आरोपीने फोन करून २४ तासांच्या आत मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांची हत्या करण्याची धमकी दिली होती
बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला गुजरातमध्ये अटक


पाटणा, 17 एप्रिल (हिं.स.)। मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपी शेखर यादवला गुजरातमधून अटक करण्यात आली आहे. शपथविधीच्या दिवशी आरोपीने फोन करून २४ तासांच्या आत मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांची हत्या करण्याची धमकी दिली होती, अशी माहिती समोर आली आहे.या प्रकरणी मुंगेर जिल्ह्यातील संग्रामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन बिहार पोलिसांनी इतर राज्यांच्या पोलिसांशी समन्वय साधला. तपासादरम्यान अहमदाबाद जिल्ह्यातील साणंद पोलीस ठाणे क्षेत्रातील पोलिसांनीही सक्रिय भूमिका घेत विशेष पथकाची स्थापना करून आरोपीचा शोध सुरू केला. पोलिसांनी तांत्रिक देखरेख (टेक्निकल सर्व्हेलन्स) आणि मानवी गुप्त माहिती यंत्रणेच्या (ह्यूमन इंटेलिजन्स) मदतीने आरोपीचा मोबाईल क्रमांक ट्रॅक करून त्याचे ठिकाण शोधून काढले. सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतर साणंद-कडी रोडवरून आरोपीला अटक करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या आरोपीची ओळख कृष्ण यादव यांचा मुलगा शेखर यादव (वय ३२) अशी झाली आहे. तो बिहारमधील बांका जिल्ह्यातील बेलहर पोलीस ठाणे हद्दीतील खेरौधा गावचा रहिवासी असून सध्या अहमदाबादच्या साणंद भागात एका ट्रान्सपोर्ट कंपनीत चालक म्हणून काम करत होता. चौकशीदरम्यान आरोपीने मुख्यमंत्र्यांना धमकी दिल्याची कबुली दिली आहे. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्याला बिहार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

मुंगेरचे पोलीस अधीक्षक सय्यद इमरान मसूद यांनी सांगितले की, १५ एप्रिल रोजी संग्रामपूर पोलीस ठाण्याला गुप्त माहितीद्वारे एक ऑडिओ क्लिप मिळाली होती. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांविरोधात अपशब्दांचा वापर करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन संग्रामपूर आणि बेलहर पोलीस ठाण्यांनी तातडीने कारवाई करत तपास सुरू केला आणि इतर राज्यांच्या पोलिसांच्या मदतीने आरोपीला अटक करण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande