महसूल सेवा नागरिकांच्या दारी; ३५८ तालुक्यांमध्ये एकाच दिवशी समाधान शिबिरे – विकास खारगे
नाशिक, 17 एप्रिल (हिं.स.) : महसूल विभागाच्या विविध सेवा नागरिकांना एकाच ठिकाणी सुलभ, पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी राज्यभरात एकाच वेळी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येत असून, तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरातून नागरिकांच्या दैनंदिन अडचणी दू
Important step towards '


नाशिक, 17 एप्रिल (हिं.स.) : महसूल विभागाच्या विविध सेवा नागरिकांना एकाच ठिकाणी सुलभ, पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी राज्यभरात एकाच वेळी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येत असून, तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरातून नागरिकांच्या दैनंदिन अडचणी दूर करून आवश्यक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे यांनी केले.

इगतपुरी तालुक्यातील कावनई येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात ते बोलत होते. यावेळी आमदार हिरामण खोसकर, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, उपजिल्हाधिकारी रवींद भारदे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी (इगतपुरी-त्र्यंबकेश्वर) डॉ. पवन दत्ता, तहसीलदार अभिजीत बारवकर तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

खारगे यांनी सांगितले की, महसूल विभागाचा सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी थेट संबंध आहे. त्यामुळे सेवा सुलभ, पारदर्शक आणि वेळेवर मिळणे आवश्यक आहे. नागरिकांना वारंवार कार्यालयात फेऱ्या माराव्या लागू नयेत, यासाठी एकाच ठिकाणी सर्व सेवा उपलब्ध करून देण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे.

राज्यातील ३५८ तालुक्यांमध्ये एकाच दिवशी अशी शिबिरे आयोजित करण्यात आली असून, महसूल विषयक सेवा, प्रमाणपत्रे, अर्ज निकाली काढणे, मार्गदर्शन तसेच शासकीय योजनांची माहिती नागरिकांना दिली जात आहे. या शिबिरांमुळे अनेक समस्यांचे तात्काळ निराकरण होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

“विकसित महाराष्ट्र २०४७” या संकल्पनेतून राज्य शासन कार्यरत असून, ‘Ease of Living’, ‘Ease of Doing Business’ आणि शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर देण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासाठी प्रशासनात तंत्रज्ञानाचा व्यापक वापर सुरू असून सातबारा उतारा मोबाईलवर उपलब्ध झाला आहे. तसेच विविध दाखले, प्रमाणपत्रे आणि काही सेवा व्हॉट्सअॅपच्या माध्यमातूनही मिळत असल्याने नागरिकांचा वेळ, श्रम आणि खर्च मोठ्या प्रमाणात वाचत आहे.

शेतकऱ्यांच्या सोयीसाठी पाणंद रस्ते सुधारणा, तसेच “सर्वांसाठी घरे” यांसारख्या योजनांवरही भर देण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले. नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी गावस्तरावर शिबिरे आयोजित करून नागरिकांचे प्रश्न तत्काळ सोडविण्याच्या सूचना दिल्या. पंचायत समिती, कृषी, आरोग्य व इतर विभागांनी समन्वयाने काम करून एकाच ठिकाणी सर्व सेवा उपलब्ध करून द्याव्यात, असेही त्यांनी सांगितले.

इगतपुरी तालुक्यात मागील दोन महिन्यांपासून विविध ठिकाणी शिबिरे सुरू असून, शेतकरी, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या एकाच ठिकाणी सोडविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे आमदार हिरामण खोसकर यांनी सांगितले.

कार्यक्रमात लाभार्थ्यांना विविध योजनांचे लाभ प्रातिनिधिक स्वरूपात वितरित करण्यात आले. तसेच शिबिरातील महसूल व शासकीय सेवांच्या १५ स्टॉल्सना विकास खारगे यांनी भेट देऊन माहिती घेतली.--------------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande