

रायगड, 17 एप्रिल (हिं.स.)। नेरळ (खांडा) परिसरातील तुलसी सेंटरसमोर धोकादायक अवस्थेत उभ्या असलेल्या महावितरणच्या वीज खांबाबाबत प्रसिद्ध झालेल्या बातमीचा अखेर परिणाम झाला असून प्रशासनाने तातडीने दखल घेत काम पूर्ण केले आहे.
काही दिवसांपूर्वी या ठिकाणी वीज खांब कोसळण्याच्या स्थितीत असल्याची गंभीर बाब समोर आली होती. खांब केवळ एका दोरीच्या आधारावर उभा असल्याने तसेच विद्युत तारा जमिनीच्या अगदी जवळ आल्याने मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. या मार्गावरून शेकडो नागरिकांची ये-जा तसेच शाळेच्या बसची वाहतूक सुरू असल्याने परिस्थिती अधिकच धोकादायक बनली होती.
या संदर्भात स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला होता. अखेर स्थानिक नागरिक मुजम्मिल मणियार यांनी लेखी तक्रार करत प्रशासनाचे लक्ष वेधले.
‘हिंदुस्थान समाचार’मध्ये या धोकादायक परिस्थितीवर प्रकाश टाकणारी बातमी प्रसिद्ध होताच प्रशासन खडबडून जागे झाले. महावितरण विभागाने तातडीने पथक पाठवून संबंधित वीज खांबाची दुरुस्ती व आवश्यक कामे पूर्ण केली.
या कारवाईमुळे संभाव्य मोठा अपघात टळला असून स्थानिक नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. मात्र, अशा घटनांमध्ये वेळेवर कारवाई होणे गरजेचे असून, समस्या गंभीर झाल्यानंतरच प्रशासन हलते, अशी नाराजीही नागरिकांनी व्यक्त केली.
दरम्यान, ‘हिंदुस्थान समाचार’च्या पाठपुराव्यामुळेच हा प्रश्न निकाली लागल्याचे बोलले जात असून, माध्यमांच्या भूमिकेचे नागरिकांनी स्वागत केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)