उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सुटणार
सोलापूर, 17 एप्रिल (हिं.स.) सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश मिळत उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उजनी प्रकल्प कालवा सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय
उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सुटणार


सोलापूर, 17 एप्रिल (हिं.स.)

सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश मिळत उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उजनी प्रकल्प कालवा सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.खासदार शिंदे यांनी अधीक्षक अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण (कडा), सोलापूर यांच्याकडे निवेदन देत पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी तात्काळ पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यांनी निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, मंगळवेढा, पंढरपूर, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर आणि अक्कलकोट या तालुक्यांमध्ये पाण्याअभावी शेतकरी अडचणीत सापडले होते.भीमा नदीचे पात्र अनेक ठिकाणी कोरडे पडल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत होते. वेळेवर पाणी न मिळाल्यास पिके जळून जाण्याची भीती निर्माण झाली होती, तर जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला होता. या पार्श्वभूमीवर स्थानिक शेतकऱ्यांनी खासदार शिंदे यांच्याशी संपर्क साधून आपली व्यथा मांडली होती.या सर्व परिस्थितीची दखल घेत खासदार प्रणिती शिंदे यांनी प्रशासनाकडे तातडीने पाणी सोडण्याची मागणी लावून धरली होती. अखेर प्रशासनाने त्यांच्या मागणीची दखल घेत उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्याने शेतकरी व नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande