
सोलापूर, 17 एप्रिल (हिं.स.)।
“संवेद २०२६ या स्मार्ट गव्हर्नन्स हॅकाथॉनमधून आम्हाला शहरातील नागरी समस्यांवर अनेक अभिनव आणि व्यवहार्य उपाय मिळाले आहेत. या कल्पनांची अंमलबजावणी करून शहरातील सेवा अधिक सक्षम करण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ.” असे विचार सोलापूरचे महापौर विनायक कोंडयाल यांनी व्यक्त केले. एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठामध्ये सोलापूर महानगरपालिकेच्या सहकार्याने आयोजित 'संवेद २०२६' या स्मार्ट गव्हर्नन्स हॅकाथॉनमधील अंतिम प्रकल्पांचे प्रदर्शन व पारितोषिक वितरण समारंभाच्या प्रसंगी ते बोलत होते. एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठामध्ये आयोजित या राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमात देशभरातील उच्च शिक्षण संस्था, महाविद्यालये आणि विद्यापीठांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यानिमित्ताने सोलापूर शहरातील नागरी समस्यांवर नाविन्यपूर्ण उपाय शोधण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले. हॅकाथॉनमधील अंतिम फेरीतील संघांनी १५ एप्रिल रोजी आपले प्रकल्प सादर केले, तर १६ एप्रिल रोजी विद्यापीठ परिसरात प्रकल्पांचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले. आज या प्रदर्शनाचे उद्घाटन आणि त्यानंतर पारितोषिक वितरण समारंभ सोलापूरचे माननीय महापौर विनायक कोंडयाल, सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, मा. अच्युत गोडबोले, प्रा. कृष्णा वेदुला, प्रा. विल्यम ओक्स, एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. गोपाळकृष्ण जोशी आणि संचालक राघवेंद्र एम. चाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी बोलताना महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे म्हणाले “महानगरपालिकेच्या वतीने आम्ही विद्यार्थ्यांनी शहरातील नागरी समस्यांवर सुचवेलेल्या उपाययोजना आणि संकल्पनांचे स्वागत करतो. पुढील सहा महिने ते एका वर्षाच्या कालावधीत त्यांचा पाठपुरावा करून प्रत्यक्ष क्षेत्रीय प्रकल्पांमध्ये रूपांतर करण्यास आम्ही उत्सुक आहोत. यासाठी आम्ही आवश्यक ते आर्थिक, पायाभूत आणि मनुष्यबळाचे साहाय्य देण्यात येईल. तसेच विद्यार्थ्यांना सहा महिन्यांच्या इंटर्नशिपची संधी देखील उपलब्ध करून देऊ.”
एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. गोपळकृष्ण जोशी म्हणाले, “विद्यापीठ म्हणून आम्ही विद्यार्थ्यांना समस्या-निवारक म्हणून घडवण्यासाठी कटिबद्ध आहोत. 'हॅकाथॉन' हा आजच्या जेन-झी’ला (Gen Z) समस्या सोडवण्याच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचा एक अत्यंत प्रभावी मार्ग आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड