
नवी दिल्ली, 17 एप्रिल (हिं.स.) : लोकसभेत महिला आरक्षणाशी संबंधित विधेयकावर चर्चा दरम्यान काँग्रेसचे खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर तीव्र टीका केली. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, २०२३ मध्ये मंजूर झालेले हे विधेयक प्रत्यक्षात महिला सशक्तीकरणाशी संबंधित नसून, त्याचा उद्देश वेगळाच आहे.
चर्चेदरम्यान राहुल गांधी म्हणाले की, “हे खरे महिला आरक्षण विधेयक नाही. परिसीमनाच्या माध्यमातून महिलांचे सशक्तीकरण होऊ शकत नाही.” त्यांनी सरकारला आव्हान देत जुने विधेयक पुन्हा आणण्याची मागणी केली आणि ते मंजूर करून दाखवू, असेही नमूद केले.
यावेळी त्यांनी सरकारवर ओबीसी समाजाला योग्य प्रतिनिधित्व देण्याची इच्छा नसल्याचा आरोप केला. तसेच अनुसूचित जाती-जमातींचे हक्क कमी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांच्या मते, हे विधेयक देशाच्या निवडणूक नकाशात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न असून, त्यासाठी महिलांचा वापर केला जात आहे.
आपल्या भाषणात त्यांनी जातीय जनगणना आणि प्रतिनिधित्व यामधील संबंध पुढील १५ वर्षांसाठी दूर ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोपही केला. तसेच भाजपला स्वतःची राजकीय ताकद कमी होण्याची भीती वाटत असल्यामुळेच असे निर्णय घेतले जात असल्याचे ते म्हणाले.
भाषणादरम्यान त्यांनी विनोदी शैलीत एक प्रसंग सांगत अमित शहा यांचा उल्लेख केला. “मी माझ्या २० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत जे करू शकलो नाही, ते माझ्या बहिणीने पाच मिनिटांत केले — अमित शहा यांना हसवले,” असे ते म्हणाले.
दक्षिण आणि ईशान्य भारतातील राज्यांना आश्वस्त करताना त्यांनी सांगितले की, त्यांच्या प्रतिनिधित्वात कोणतीही घट होऊ दिली जाणार नाही. “दक्षिणेकडील, ईशान्येकडील आणि लहान राज्यांचे हक्क आम्ही अबाधित ठेवू,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
शेवटी, सरकारच्या धोरणांवर टीका करत त्यांनी हे राष्ट्रविरोधी कृत्य असल्याचा आरोप केला आणि संपूर्ण विरोधक मिळून याला विरोध करतील, असा इशाराही दिला.
---------------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode