विधिमंडळात विद्यार्थ्यांची अभ्यासक भेट; डॉ. नीलम गोऱ्हे यांचा संवाद ठरला विशेष आकर्षण
मुंबई, 17 एप्रिल, (हिं.स.)। विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० लहान विद्यार्थ्यांनी आज विधानभवनाला अभ्यासक भेट दिली. या भेटीदरम्यान उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि मंत्री आदिती तटकरे यांनी बालविद्यार्थ्यांशी
मुंबई


मुंबई, 17 एप्रिल, (हिं.स.)। विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० लहान विद्यार्थ्यांनी आज विधानभवनाला अभ्यासक भेट दिली. या भेटीदरम्यान उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि मंत्री आदिती तटकरे यांनी बालविद्यार्थ्यांशी साधलेला संवाद विशेष आकर्षण ठरला.

उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी अतिशय सोप्या आणि लहान मुलांना समजेल अशा भाषेत विधिमंडळाचे कामकाज उलगडून सांगितले. “जशी शाळेत शिस्त पाळून नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाते, तसेच विधानभवनातही नियमांचे काटेकोर पालन केले जाते. नियम मोडल्यास इथेही शिक्षा होते,” असे सांगत त्यांनी वरिष्ठ व कनिष्ठ सभागृह, सदस्यांची रचना आणि नियमांची अंमलबजावणी याबाबत रंजक उदाहरणांसह माहिती दिली.

बालविद्यार्थ्यांनीही उत्साहाने प्रश्न विचारत संवाद रंगवला. यावेळी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मुलांशी गप्पांच्या माध्यमातून महत्त्वाचे निर्णय आणि धोरणांची माहिती दिली.

कार्यक्रमात अनिकेत तटकरे यांनी ही दोन्ही सभागृहांची सविस्तर माहिती दिली, तर जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांच्यासह अधिकारी व शाळेचे प्रतिनिधीही उपस्थित होते. बालविद्यार्थ्यांसाठी ही अभ्यासक भेट केवळ शैक्षणिक नव्हे, तर लोकशाहीची कार्यपद्धती समजून घेण्याचा एक प्रेरणादायी अनुभव ठरली.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande